पोहे


वर्षभर वाट पाहिलेल्या सुट्ट्या लागल्या आणि काय काय करू आणि काय नको असे झालेय. सुट्टीत बाकी काहीही करा किंवा न करा, हे खायचेय - ते करून बघायचेय असले प्लॅन असतातच असतात. त्यासाठी किराणा भाजीपाला आणलेला असतो, रेसिपी सेव्ह केलेली असते. सुगरणीचे सल्ले ऐकलेले असतात. थोडक्यात सगळी तयारी झालेली असते वाट फक्त सुट्टी लागण्याची. पण....

सकाळ होते, तीही निवांत आणि आता कुठे प्रयोग वाटतानाच मनात येते चला आता पोहे करूया आणि मग इतर सगळ्या विचारांना सुट्टी मिळते.

जगाच्या पाठीवर कुठेही जा, हवामान कोणतेही असू द्या, पोहे आणि ब्रेकफास्ट या समीकरणाला तोड नाही. सुट्टी आहे, पोटभर झोप झालीय, गुगल-रेडिओ कोणीतरी काहीतरी बरे वाजवतेय, आणि जिरे-मोहरी-कढीलिंब-मिरचीच्या फोडणीचा वास सगळीकडे पसरलाय, याहून सुख सुख ते काय असते? पटकन होणार सोपा म्हणून करावा असा पदार्थ असला तरी सगळ्यांच्याच हाताचे पोहे खाण्यासारखे असतात असे नाही. पोहे भिजवणे ते शेंगदाणे खरपूस परतणे, कांदा कोथिंबीर छान चिरणे पासून फोडणी नीट करणे. प्रत्येक स्टेप सोपी पण तितकीच कौशल्याची. बटाटा घालणार्याचे एकसारखे खरपूस काप, कोवळे मटार, फ्लॉवरचे तुरे, व्यक्ती तितक्या पोह्याच्या पाककृती. बरे नुसते फोडणीच्या पोह्यांचे कौतुक करून कसे चालेल? दडपे, लावलेले, दहीपोहे सगळ्यांचे आपापले दिवस असतात आणि त्यावेळी तेच जगात भारी असतात. भिजवलेल्या पोह्यांवरच हळद,मीठ,साखर घालून कालवणारे लोक असतात जसे साबुदाण्याच्या खिचडीत आधीच सगळे घालून मग तुपावर टाकणारे असतातच की. शेवटी काय तर पोह्यांच्या बाबतीत, "you do you!" हेच खरे.

कोणतीही चव कधीच एकटी येत नाही.  पोहे भरलेली, कोथिंबीर पेरलेली, लिंबाची फोड असलेली बशी समोर आली कि काही आठवणी जोडीने येतात. बऱ्यावाईट, त्यात्यावेळी सोबत असणाऱ्या सगळ्या गोतावळ्या सगट ते पोहे अधिकच आपले वाटतात. त्या छोट्या बशीत कधी दुर्गाबाई भागवतांच्या 'खमंग' मधले कुवळाचे पोहे सामावलेले असतात तर कधी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल बाहेरचे फक्त हिरवी मिरची असणारे तिखट पण भुकेच्या वेळी गोड लागणारे पोहे असतात. लहानपणी तर मी आणि दादा, आम्हाला रोज पोहे दिले तरी आम्ही आनंदाने खाऊ म्हणायचो आणि आजही त्या मतावर दोघेही ठाम आहोत. फक्त ते करणारी व्यक्ती आमची आई होती त्यावरून ताई झाली तेवढाच फरक. प्रत्येक कुटुंबात एक बेस्ट पोहे करणारा/री असतोच. सुट्टीच्या दिवशी त्याच्या हाताचे आयते पोहे, छान कडक चहा याला पर्याय नाही.

गेल्या शंभर एक ख्वाबिदांकडे वळून पहिले तर खाण्याचे  संदर्भ जरा जास्तच आढळतात. पण काय करणार विचारांच्या प्रवासात मेंदूला खुराकही लागतोच. पोह्यांइतका बेस्ट दुसरा तो काय असणार? जरी 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' म्हणणारे समर्थ वंदनीय असले तरी खाण्यासाठी जन्म आपुला हे हि मनापासून पटलंय ना!

-श्रुतकिर्ती 

२४/१२/२०२२



Comments

  1. आतातर ह्या सुट्टीत पोहे तर खायलाच हवेत 😄💕 ~ कल्याणी

    ReplyDelete
    Replies
    1. लवकर कर सुट्टी पटकन संपते😁

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान