Posts

Showing posts from February, 2023

न वाचलेले पुस्तक...

Image
  तीन-चार आठवड्यांपूर्वी, लायब्ररीत शिरल्या शिरल्या समोर डिस्प्लेमध्ये एक पुस्तक दिसले. लांबून नाव, लेखक काहीच दिसले नाही पण कव्हर लक्ष वेधणारे होते. कुठेतरी पाहिल्यासारखेही वाटत होते. दोन-चार सेकंदांमध्ये, चार पावलांवर गेल्यावर नाव दिसले आणि " अ रे हे पुस्तक होय!" असे भारी वाले फिलिंग आले. पुस्तकाचे नाव वाचले आणि बरेच काही क्लिक झाले.  लेखक, त्याची आधीची पुस्तके, हे नवे येणार याची बरीचशी झालेली जाहिरात. कोणीतरी वाचून त्याचा टाकलेला रिव्ह्यू आणि तो मी अर्धवट वाचून सोडल्याचेही आठवले.  लायब्ररी मधील इतर कामे करताना डोक्यातून हे पुस्तक काही जात नव्हते पण उचलून हातातही घेतले गेले नाही. कामे संपली. मी तशीच बाहेर  पडले.  पुस्तक तिथेच राहिले.  नंतर एक- दोन वेळा ते डिस्प्लेवर दिसलेही पण आता त्याकडे दुर्लक्ष होत होते. बहुतेक मुद्दामच.  हातात घ्यावे, चाळावे,घरी न्यावे,वाचावे असे सगळे वाटत होते पण तरीही टाळलेच गेले.  काल पुन्हा लायब्ररीत गेले तर डिस्प्लेला दुसरेच काहीतरी. रंगीबेरंगी शिवणकाम का विणकाम असे लावलेले. उगीचच मनखटू झाले. समोर होते तेव्हा घेतले नव्हते आता मात्र वाईट वाटत होते.

सारं कसं छान छान

Image
दिवस संपला , आठवडाही संपायला आला मग कोणालातरी उगाचच प्रश्न पडला , कसं काय ? दिवस पार पडला ? पटकन म्हटले छान छान दिले उत्तर , थांबला संवाद. जातोच ना रोजचा दिवस छान ? प्रश्न पडायलाच हवा का उत्तर देतांना ? अशी काय  मणामणाची  ओझी उचलली दमायला ? का गुंतागुंत सोडवली डोक्याला छळायला ? क्षणभराचा प्रश्न मग उत्तरही क्षणाचेच छान छान म्हटल्यावर कोडेच सुटते ना सगळ्यांचे. पण , कधीतरी हुकतोच तो एक पळ मधेच थांबवतो मग उत्तरही सोपे सरळ. उगीचच डोके जाते खाजवले आणि सापडते उत्तर नवे नवलाईचे. काहीतरी टोचलेले , काहीतरी बोचलेलें मिळाली उसंत म्हणून उगाचच सललेले, रिकामपणाचा उद्योग , दुखलेले सुख आठवते हळूच आणि मोठे होत जाते उत्तर खूप. मोठे उत्तर मग वाढवते प्रश्न सरळ वाटेला मग येते अवघड वळण. असली वळणे त्रासदायक फार खडखड , धडपड , रस्ताच चुकार धडपडले कि येते डोके जाग्यावर दिसायला लागते सगळे क्लिअर. तो उसंत घेतलेला क्षणाचं घालतो घोळ पळभराचा विचार फसवतोच कि सरळ. पटकन म्हटले छान छान   विषयच मिटला , नकोच तो रस्ता सगळा प्रश्नच सुटला.   - श्रुतकिर्ती - १