न वाचलेले पुस्तक...

 तीन-चार आठवड्यांपूर्वी, लायब्ररीत शिरल्या शिरल्या समोर डिस्प्लेमध्ये एक पुस्तक दिसले. लांबून नाव, लेखक काहीच दिसले नाही पण कव्हर लक्ष वेधणारे होते. कुठेतरी पाहिल्यासारखेही वाटत होते. दोन-चार सेकंदांमध्ये, चार पावलांवर गेल्यावर नाव दिसले आणि "रे हे पुस्तक होय!" असे भारी वाले फिलिंग आले. पुस्तकाचे नाव वाचले आणि बरेच काही क्लिक झाले.  लेखक, त्याची आधीची पुस्तके, हे नवे येणार याची बरीचशी झालेली जाहिरात. कोणीतरी वाचून त्याचा टाकलेला रिव्ह्यू आणि तो मी अर्धवट वाचून सोडल्याचेही आठवले. 

लायब्ररी मधील इतर कामे करताना डोक्यातून हे पुस्तक काही जात नव्हते पण उचलून हातातही घेतले गेले नाही.कामे संपली. मी तशीच बाहेर  पडले.  पुस्तक तिथेच राहिले.

 नंतर एक- दोन वेळा ते डिस्प्लेवर दिसलेही पण आता त्याकडे दुर्लक्ष होत होते. बहुतेक मुद्दामच.

 हातात घ्यावे, चाळावे,घरी न्यावे,वाचावे असे सगळे वाटत होते पण तरीही टाळलेच गेले.

 काल पुन्हा लायब्ररीत गेले तर डिस्प्लेला दुसरेच काहीतरी. रंगीबेरंगी शिवणकाम का विणकाम असे लावलेले. उगीचच मनखटू झाले. समोर होते तेव्हा घेतले नव्हते आता मात्र वाईट वाटत होते. लगेच चालत तशा पुस्तकांच्या रांगेत गेले.  होते की पुस्तक कपाटात!  एक सोडून दोन कॉपी!  मग आता घ्यावे की पटकन, पण पुन्हा टाळले आणि तशीच वळले.

 अनेकदा वाचलेले ' डोन्ट जज अ बुक बाय कव्हर' आठवले. मी तेच करत होते.  हा लेखक ना असेच लिहिणार, cover  वर हे चित्र... वेगळे काय असणार, अर्धवट वाचलेला रिव्ह्यू हेच सांगतोय, मग कशाला वाचा.मला कुठे असले वाचायला आवडते. इट्स नॉट माय स्टाईल...

हे सगळे मनाचे खेळ मेंदूच्या कुतूहला पुढे भारी पडले. पुन्हा पुस्तक लायब्ररीमध्येच राहिले. पुस्तक कोणते , कोणाचे, कोणत्या भाषेतले, आत काय होते?  हा प्रश्नच इथे महत्त्वाचा नाहीये.

 आधीच जजमेंट दिलेल्या मनाने मेंदूला कृती करू दिली नाही हेच त्रासदायक झाले. कदाचित आवडले नसते पुस्तक! पूर्ण वाचवले गेले नसते.  मनाने मेंदूला, बघ तुला सांगितले होते ना असे दहा वेळा म्हटले असते. थोडा वेळ वाया गेला असता असे वाटले असते. पण...

 पण कदाचित आवडलेही असते. मनाला न आवडलेले पुस्तक मिटून बंद करून बाजूला ठेवता येते हे शिकता ही आले असते.  ती संधी गेली आणि पुस्तक न वाचलेलेच राहिले.

- श्रुतकीर्ती

10/02/2023



Comments

Popular posts from this blog

कंटाळा

पद्धत

अवरग्लास