पॉज
किती वेळची नुसतीच बसली आहेस, काही काम नाहीये
का आज? या वाक्यानंतर जाणवते,
किती वेळ गेला असेल या स्तब्धतेत. शांततेत. काहीच न करण्यात. पण खरंच
काही केलेच नव्हते का त्या वेळात मी? तो होता दोन कामातला पॅाज.
वरवर शांत, स्तब्ध, स्थिर असलेल्या या
मनाचा तळ अशावेळी किती खळखळत असतो ते त्या
समोरच्याला काय दिसणार? त्यातल्या
त्यात चित्रकाराला, संगीतकाराला, थोडक्यात आधी मेंदूत काहीतरी शिजवून मग
प्रत्यक्षात उतरवणाऱ्या प्रत्येकाला या वेळेचे महत्त्व असतेच. त्या सगळ्यांचा
भरपूर वेळ जगाच्या दृष्टीने काही न
करण्यातच जातो. पण त्या शांततेतूनच,
पॅाज
मधूनच जगातल्या सगळ्या भावनांची हालचाल घडवणार्या कलाकृती तयार होतात. तरीही
काहीतरी कर, रिकामे बसू नको हे आपणच आपल्या मेंदूला लावलेले टुमणे आपण सोडत नाही.
शांत बसले की, स्वतःला
त्या परिस्थितीतून बाहेर काढले की मग सगळे चित्र स्पष्ट दिसते. उत्तरे सापडतात,
प्रश्न
सुटतात, पण तो पॉज घेण्याचा वेळ दिला तर पाहिजे ना मेंदूला. नुसत्या टू डू
लिस्ट टिक ऑफ करून दिवस संपवण्यात काय मजा?
सोमवारी
शुक्रवारची वाट पाहायची काहीच न करण्यासाठी आणि गुरुवारीच शनिवार रविवार गच्च भरून
टाकायचा कार्यक्रमाने. मग पाच मिनिटे जरी रिकामी राहिली तर काहीतरी चुकल्यासारखे
वाटायला लागते. या शांत बसण्याच्या पाच मिनिटात केवढी ताकद असते ते, पाच
मिनिटाच्या मेडिटेशनच्या शेवटी आता हळूच हालचाल करा असं सांगतात तेव्हा कळते. काही न करता बसलेलाच अशावेळी सगळ्यात जास्त
कामात असतो. मन, मेंदू सगळ्यात
जास्त काम तेव्हाच करतात. ते दोघेही जर
काही न करता शांत बसले तर खरी मजा.
पिकासो चित्र काढताना भरभर काम करायचा आणि काही वेळाने ते चित्र
बाजूला ठेवून दुसऱ्या चित्राकडे वळायचा काही दिवसांनी त्या चित्राकडे परत यायचा
आणि पूर्ण करायचा. हा मधला काळ त्या
चित्राकडे बघण्याची एक अख्खी वेगळी दृष्टी त्याला द्यायचा. एखादा विचार, कृती थांबवणे बऱ्याचदा अवघडच. पण दुसरा
विचार, दुसरी कृती, नवा उद्योग निदान काही काळासाठी तरी त्या
विचारांना बाजूला टाकते आणि मेंदूच्या
गतीला आवर घालते. नाहीतर एका दिशाने निघालेल्ला विचार शेवटी कोणत्या मुक्कामाला
पोहोचेल आणि परिणाम काय करेल हे ठरवणेच अवघड.
आजच्याच शांततेत हे सगळे
आठवण्याचं कारण म्हणजे आता सुट्टी संपत आली. हा डिसेंबर मधला पॉज मागच्या वर्षाला
पुढच्या वर्षात जोडण्यासाठी घेतला जातो.
सुट्टी संपली पुन्हा काम सुरू होईलच. नवे वर्ष, नवी कामे, नवे
प्रश्न, नवी उत्तरे सगळे काही पुन्हा सुरू होईल. पण मागच्या वर्षानंतरचा हा
पॉज थोडेसे मागे येऊन पुन्हा नव्या वर्षात उडी मारण्यासाठी नक्कीच उत्साह आनंद
देऊन गेला.
त्या आनंदातच, सगळ्यांना नुतन वर्षाभिनंदन. Happy
new year!
-श्रुतकिर्ती
-०४/०१/२०२५
Mastch
ReplyDelete