पद्धत


घरोघरी ख्रिसमस ट्री सजवले जावू लागले की मला एक घटना कायम आठवते.

 बऱ्याच वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी नोव्हेंबर आल्यावर; सुट्ट्या, ख्रिसमस, सेलिब्रेशन हे नेहमीच यशस्वी विषय चर्चेत चालू होते. एक जण तिच्या,  विविध प्रकारच्या काचेच्या, लाकडी, कापडी ऑर्नामेंट्सने नटलेल्या भरगच्च झाडाचे फोटो दाखवत होती. झाड सुंदर दिसत होते आणि शेजारीच फोटोत मोठ्या दोन बॉक्सेस आणि सगळी ऑर्नामेंट्स जपून ठेवायला लागणारे पॅकिंगचे सामान दिसत होते. मेहनत खूप लागत असणार हे कळून येत होते. सहजच किती छान आहे हे सगळे. कसे जमवले? हे विचारल्यावर लकाकलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, “ हा ख्रिसमस ट्री माझ्या मोठ्या मुलीच्या पहिल्या ख्रिसमसला घेतलाय आणि दरवर्षी मी घरातल्या प्रत्येकाच्या नावाने एक डेकोरेशन घेते ही आमच्या घरची मी सुरू केलेली ट्रॅडिशन आहे. I will pass this to my daughters and they can add something new every year to make it  their own.”

इतका वेळ भारी वाटणारे फिलिंग, मी पुढे हे कुणाला तरी देणार चालू ठेवायला इथे येऊन ठेचकाळले. तिला काहीतरी स्वतःसाठी करावे वाटले, सजवणे खरेदी करणे नंतर त्याची योग्य उस्तवार करणे दरवर्षी आवडत राहिले,जमत राहिले. तिने  ते केले आणि तिला आनंद मिळत असेल तर जरूर करावेच. पण दुसऱ्याला का द्यावे?  आणि त्याने ते असेच पुढे चालवावे ही इच्छा तरी का? त्या माणसाची आवड निवड पाहून तो करेल की काहीतरी त्याचे त्याचे.

 हे मनात आले आणि ट्यूबलाईट पेटली अरे याच की प्रथा-परंपरा- पद्धती.

मग हा छंदच लागला. प्रत्येक प्रसंगानुरुप केल्या जाणाऱ्या ठराविक घटना किती मागेपर्यंत जातात? त्या कशा आणि कुणी कुणी किती बदलल्या? आपापले चार आणे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने किंवा काळाची गरज म्हणून कसे घातले किंवा कमी केले?  हे शोधत बसण्याचा.

या रिकाम्या उद्योगाने मनाची करमणूक तर भरपूर झाली. आपण किती गोष्टी कुणाच्यातरी पाहून, कोणीतरी सांगितल्या म्हणून, मला असेच जमते एवढाच वेळ असतो, याच दिवशी हेच करायचे असे म्हणत म्हणत करत राहतो, तेही वर्षानुवर्ष. काही बदल घडतात, घडवतो आपण किंवा काही अगदी माशी टू माशी तसेच करतो.

प्रथा , पद्धत  असते तरी का? एक साचा एकदा तयार झाला की एका छाप्यातून कमी कष्टात कमी वेळात सेम प्रॉडक्ट तयार व्हावे म्हणून?  समोरच्याने त्याची फार बुद्धी न वापरता आपण जे करत आलो तेच करावे म्हणून? का काळाच्या निसटत्या वाळूवर आपला शिक्का उमटवावा म्हणून?

 साच्यात घालून एक सारख्या मूर्ती घडविण्यातही मजा असते पण कधी कधी तो साचाच बाजूला ठेवून मनात येईल तो आकार घडवण्यात तर जास्तच मजा असते.  फक्त असे काहीही करावे असे मनापासून वाटले पाहिजे. आनंद वाटला पाहिजे. जेव्हा असा आनंद वाटतो तेव्हा मग हे सगळे स्वतःपुरते केले जाते. मला आवडते म्हणून मी करते इथेच संभाषण संपते. हे नंतर कुणाला तरी देईन, पुढे सुरू ठेवायला, हा विचारच मनात येत नाही. आणि मग झाडावरच्या प्रत्येक  सजावटीची गोष्ट दरवर्षी नव्याने आठवण्यात,  ऐकण्यात आणि सांगण्यात जाणवणारा उत्साह ‘holidays are here ‘ची जाणीव करून देत राहतो.

-श्रुतकिर्ती

-२८/१२/२०२४



Comments

Popular posts from this blog

विसर्जन

थांबा जरा !

नांव ठेवतांना