Posts

Showing posts from July, 2023

“मी पण!”

Image
काल मैत्रिणीने एक व्हिडिओ पाठवला. प्राण्यांच्या मनातले जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद करणाऱ्या एका ॲनिमल कम्युनिकेटर किंवा व्हिस्पररचा. छानच होता. लगेच बोलता बोलता हीलर , ॲारा रिडर असे सगळे विषय चर्चेत आले. हे सगळे खूप इंटरेस्टिंग आहे वाटायला लागल्याने आणखीन चार दोन व्हिडिओ पाहिले. AI च्या कृपेने लगेच ऑनलाईन कोर्सेस च्या जाहिराती दिसायला लागल्या आणि आपणही हे करून बघावे असे मन मांडे खायला लागले. मनातलेच मांडे पटकन तयार झाले आणि डोळ्यापुढे पार क्रिस्टल बॉल , धूर , रंगीबेरंगी स्टोन्स आणि मध्ये मी असले चित्र दिसले. तेवढ्यात ,   दुसऱ्या एका मैत्रिणीने रिकाम्या डब्यात चार लाडू घालून पाठवले होते ते आठवले. मैत्रिण सुगरण. मिठाया खाव्यात तर तिच्याच हातच्या. त्यामुळे पटकन लाडू तोंडात टाकला आणि आपणही डिंक आणून ठेवलाय विकेंडला लाडू करूया. तेव्हा हिलाच विचारू नक्की काय केले , हेही मेंदूने नोंदवून ठेवले. तिसऱ्या मैत्रिणीची बाग फार छान. कोणतीही काडी तिने जमिनीत रोवावी आणि रोपाने बहरून फुले फळे द्यावीत इतकी तिची हातोटी. तिची फुलेपाने पाहिली की तो विकेंड बाग खुरपण्यात आणि आहे ती चार झाडे खत -माती करण्

भाजीवाली

Image
  रविवारच्या असंख्य ठरवलेल्या , 24 तासात 28 तासांची कामे फिट करण्याच्या यादीत भाजी आणि भाजी बाजारातील चक्कर सकाळ सकाळच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये मोडते. तसेच आज सकाळी भाजी घेताना नेहमीची भाजीवाली घेतलेल्या कोथिंबीर पुदिनाच्या जुडीला थांब   थांब म्हणत पुदिन्याची दुसरी जुडी घेऊन आली. ती मुळे असलेल्या काही काड्या असलेली. कुंडीत लाव आता. स्प्रिंग आला की तुला खूप पुदिना मिळेल , असे तिच्या मोडक्या तुटक्या व्हिएतनामिज इंग्रजीत हात वारे करत करत म्हणाली. कुठला तो भाजी बाजार ,   त्यातली माझ्यासारखी अनेक गिऱ्हाईके. ती   बऱ्याच जणांशी असं छान छान वागत असणार. पण मला एकदम स्पेशल असल्याचे भारी फिलिंग आले. आणि रस्ताभर अशा सगळ्या भाजीवाल्यांची आठवण रविवारचा रस्ता पटकन संपवणारी ठरली. आईच्या दर शनिवारच्या राणी लक्ष्मीबाई मंडईतली चिंगी. एका शनिवारी आईने भरपूर भाज्या थोड्या थोड्या आणि एक वेताची दुरडी घेतल्यावर , काय चाललेय ? हा प्रश्न विचारून मुलगी फॅन्सी ड्रेस मध्ये भाजीवाली होते म्हणताच , “ त्याच शाळेबाहेर मी बोर चिंचा विकते.माझ्याकडून पानाची चंची आणि कमरेचा पट्टा घे” म्हणाली. आणि खरंच दिलाही दुसऱ

मागे वळून पाहतांना …

Image
काल तीन- साडेतीन वर्षांनी आम्ही दोघी पुन्हा आमच्या पुर्वी नेहमीच्या असलेल्या कॅाफी शॅापला गेलो. कारण तीचे मला भेटायला दुरचा प्रवास करून येणेच होते. तीच कॅाफी सांगितली आणि नेहमीचा टी केक मागितला… काउंटरवरची मुलगी बावचळली, आमच्या कॅफेत असा केक नसतो म्हणाली आणि मधली वर्षे निघून गेल्याचे भान आम्हा दोघांनीही आले. मग वेड्यासारखे हे बदलले, या जागी ते आले….. मागे वळून बघण्याचा छंदच लागला . घरी आले शुक्रवार आला, आणि जाणवले आज शंभरावा ख्वबिदा . काल दुपारचा चळ आज परत लागला. आणि आठवडे न् आठवडे मागे घेवून जाउ लागला. नांव सुचणे ते ब्लॅाग तयार करणे ही प्रोसेस सोपी होती. पण हे काय असावे पेक्षा यात काय नसावे हे ठरवणे अवघड होते. मनात कधीही केंव्हाही कसेही randomly  येणाऱ्या विचारांचा हा ब्लॅाग तर मग यात सगळेच असणार की, स्वत:चा शोध सुज्ञपणाने घ्यायचा होता. मीपण शोधतांना मीपणाने दुखवणे, खुपवणे, जखमांच्या खपल्या काढणे, उगाच स्वतःलाच असला तरी सल्ला न देणे हे पक्के ठरले आणि मग सगळे सोपे झाले. कोऽहं हा प्रश्न त्रयस्थ बनून स्वतःकडे पाहीले की सुटतो हे समजल्याने, विचारांना न थांबवायला मेंदूला जमायला लागले. मनात

प्रश्नोत्तरे

Image
प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच , पण प्रश्न असावाच लागतो कां ? विशेषतः , उत्तर माहीत असणारा प्रश्न विचारावाच वाटतो तरी कां ? उत्तरे सरळ सोपी असतात म्हणून प्रश्न अवघड करायचे असतात कां ? सरळ उत्तर देणार्याला पेचात टाकायला , वाकडे प्रश्न तयार करायचेच असतात कां ?   उत्तर फार सोपे… एका पुर्णविरामात संपणारे त्याला , पण परंतू किंवा करायला लावायला , प्रश्न टाकायचेच कां ?   उत्तराकडून अपेक्षांच जास्त म्हणून मग प्रश्नही वाढवायचेच कां ? सरळ सोपे उत्तर कां ? कुणी ? कसे ? कुठे मध्ये अडकवायचेच असते कां ?   आता दे उत्तर , ये मैदानात , चल रिंगणात ही प्रलोभने दाखवायला प्रश्नांचीच मदत होते म्हणून मग सरळ सरळ प्रश्नोत्तरांच्या कुस्तीत आपला पैलवान उतरवायचाच कां ?   हेतू चांगला असेल तर प्रश्नाशिवायही उत्तर मिळते पण मीच एक शहाणा सांगायला प्रश्नांचे जाळे विणायला लागते   प्रश्न विरूध्द उत्तर उत्तरावर मात करणारा प्रश्न खेळ रंगावावाच लागतो कां ? तिकीट न विकताच प्रश्नांचा खेळ पटावर लावावा वाटतोच कां ?   शेवट काय ? प्रश्न विचारणारा शहाणा ? ह