मागे वळून पाहतांना …

काल तीन- साडेतीन वर्षांनी आम्ही दोघी पुन्हा आमच्या पुर्वी नेहमीच्या असलेल्या कॅाफी शॅापला गेलो. कारण तीचे मला भेटायला दुरचा प्रवास करून येणेच होते. तीच कॅाफी सांगितली आणि नेहमीचा टी केक मागितला… काउंटरवरची मुलगी बावचळली, आमच्या कॅफेत असा केक नसतो म्हणाली आणि मधली वर्षे निघून गेल्याचे भान आम्हा दोघांनीही आले. मग वेड्यासारखे हे बदलले, या जागी ते आले….. मागे वळून बघण्याचा छंदच लागला .

घरी आले शुक्रवार आला, आणि जाणवले आज शंभरावा ख्वबिदा . काल दुपारचा चळ आज परत लागला. आणि आठवडे न् आठवडे मागे घेवून जाउ लागला. नांव सुचणे ते ब्लॅाग तयार करणे ही प्रोसेस सोपी होती. पण हे काय असावे पेक्षा यात काय नसावे हे ठरवणे अवघड होते. मनात कधीही केंव्हाही कसेही randomly  येणाऱ्या विचारांचा हा ब्लॅाग तर मग यात सगळेच असणार की, स्वत:चा शोध सुज्ञपणाने घ्यायचा होता. मीपण शोधतांना मीपणाने दुखवणे, खुपवणे, जखमांच्या खपल्या काढणे, उगाच स्वतःलाच असला तरी सल्ला न देणे हे पक्के ठरले आणि मग सगळे सोपे झाले.

कोऽहं हा प्रश्न त्रयस्थ बनून स्वतःकडे पाहीले की सुटतो हे समजल्याने, विचारांना न थांबवायला मेंदूला जमायला लागले. मनात आले तिथे मनाने मेंदूला न्यावे म्हणजे त्या दोघांची जोडी एकत्र बरेच फिरवून आणते हे दोन चार आठवड्यात चांगलेच कळले.

आज नुसते उलट जाउन नावे वाचतांनाही तो दिवस, तो प्रसंग दिसायला लागला आणि मधल्या गेलेल्या काळाने पुन्हा वाचतांना त्यातली ख्वबिदा कोऽहं वरून सोऽहं होतांना दिसायला लागली.

त्याही दिवशी नुसतेच विचारांना observe करायचे होते आणि जे जाणवेल ते मांडायचे होते. आज तर मांडलेले नुसते बघायचे होते. मनात येणारे किती लांबवर फिरवून आणते हे तेंव्हाही आणि आजही आश्चर्यच होते. फक्त आज नुसत्या आश्चर्याबरोबरच त्यातल्या प्रत्येक प्रवासाने कोऽहं च्या प्रवासाला निघालेल्या स्वत्वाला, ताकद , स्थिरता आणि आत्मभान कमी अधिक प्रमाणात दिले होते त्याची जाणिव होत गेली.

या प्रवासाला निघतांनाची उत्सुकता आजही कायमच आहे. स्वत्वाचे भान आजूनही पुर्णतः काय अंशतः ही आलेले नाही. एकदा ते आले की हा प्रवास अपोआपच थांबेल. थांबवला हे सांगावेही लागणार नाही. विचारांचे अमुर्त स्वरूप मग त्या स्वत्वाला त्याचे मुर्त स्वरूप विसरायलाच लावणार. तोवर मात्र हे मन हे मेंदू घटनांची नोंद घेतच राहणार आणि त्या विचारांच्या जगात फेरफटका मारण्यानेच, being in the clouds of these arbitrary thoughts will continue my journey as ख्वाबिदा!

- श्रुतकिर्ती

०७/०७/२०२३



Comments

  1. वाह, खूप छान मांडणी विषयाची 🙏🏼

    ReplyDelete
  2. अप्रतिम!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

काहीतरी राहिलंय!

भान