Posts

Showing posts from October, 2023

भान

Image
  आजूबाजूला बघतांना कळतं ; खंबीर बनायचंच असतं , थोडं अवघड असतांनाही सगळं छानंच असतं   मृदू , कोमल , हळूवार ; मन जपायला शिकलेलंच असतं , कारण आधीचं गिरमिटलेलं सगळं पुसायचं पण असतं   मेहनत , काम , कष्ट ; गरजेला सगळं करायचंच असतं , पण स्वप्न पाहातांना मात्र दिवस न् रात्रीचं गणितंच नसतं   धटाशी धट आणि खटाशी खट ,   जगराहाटीला धरून वागायचं असतं , स्वतःसाठी   मात्र स्वतःच ताठ कण्याने उभं रहायचंही असतं   चुकलं की सुधरवायचं असतं ; हरलं की पुन्हा नव्याने खेळायचं असतं , कुठेतरी कधीतरी विश्वास ठेवून बघायचंही असतं   प्रयत्नात कमी पडायचंच नसतं ; हरवलेलं शोधायचही नसतं , पण पुन्हापुन्हा गमावेल असं काही करायचंही नसतं   विचार करून , मनाशी बोलून शहाण्यासारखं वागायचं असतं ; पण तरीही प्रत्येकक्षण जगणं सोडायचंही नसतं   मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं….   - श्रुतकिर्ती २७/१०/२०२३

माझी उशी

Image
  ही जी उशी आहे ना , कापूसच नाही तीच्या आत पण भरली आहेत स्वप्नं  मात्र   सात…. कधी रंगीबेरंगी , कधी धवल तर कधी कधी अगदीच सरळ उशीची आणि स्वप्नांची ; खुप गाढ मैत्री डोकं ठेवताच दोघांच्या गप्पा रोज रात्री डोळे ही मग यात होतात सामील , मिटून घेतलेल्या पापण्या मेंदूला ठेवतात गाफील स्वप्नांचा हात धरून डोळे खुप लांबवर जातात , दमून भागून गजराआधी बरोब्बर परत येतात चुकूनमाकून कधीकधी तिथेच रमतात , परत आल्यावर स्वप्ने उशीवरच रेंगाळतात उघड्या डोळ्यांना दिसतात ती खरी , पण हाती लागतील तर स्वप्ने ती कसली ? उशीवरची स्वप्ने लपतात उशीत परत ; उघडे डोळे आणि मन , मात्र असतात त्यांनाच शोधत   - श्रुतकिर्ती ०८/१०/२०२३