Posts

Showing posts from April, 2021

झळ

Image
  रोजचा दिवस नवीन बातमी घेऊन उजाडतोय. खरे म्हणाल तर जुनीच बातमी अजून त्रासदायक करून दाखवतोय. कितीही असंवेदनशील असलेले मन सुद्धा याकडे तटस्थपणे बघू शकणार नाही. रोजच्या जगण्यात दुःख हे असतेच एक हिस्सा म्हणून , सध्याच्या प्रसंगापेक्षाही वाईट प्रसंग येऊन गेलेले असतात वैयक्तिक आयुष्यात. मग याच वेळी याचे परिणाम इतके खोल का होताहेत ? आजूबाजूला कोणी गेले , गंभीर आहे कळले कि त्याचा परिणाम इतका जास्त का होतोय ? एकदा वाटले कि दुःखाने इतकी समोरून धडक दिलीच न्हवती कां कधी ? तर हो खरंच   खूप फिल्टर्स होते मध्ये , अगदी लहानपणी कुणी वारले कि , बातमी अती सौम्य होऊन मिळायची. बहुदा आईबाबा , आजी आजोबा कुणाच्यातरी घरी जाऊन आलेत. तिथे काहीतरी वाईट घडलेय एवढेच कळायचे. मग कधीतरी मृत्यू हि संकल्पना कळली. जवळचे , नात्यातले ,extended family मधले कोणी गेले तरी आई बाबा होते बरोबर धीर द्यायला. दुःखाची तीव्रता कमी करायला. जे झाले ते अपरिहार्य होते. काळापुढे कोणाचे काय चालते इत्यादी सौम्यपणे समजावत. या सगळ्याची झळ कमी करायला. हळूहळू हे समजावून सांगायची गरज कमी होत गेली. दुसऱ्याला तर कधी स्वतःला धीर देण्याची समज

जळमटे

Image
  दिवस फार मजेशीर आहेत सध्याचे. मनाच्या शांत डोहात खळबळ माजायला एक छोटासा दगड पुरेसा ठरतो. आणि मग तरंग उठतच राहतात. मग अस्वस्थ मन रिकामी कामे शोधतच राहते. हे आवर ते आवर ... शोधून शोधून उकरून कामे काढावीशी वाटतात. मग सुरवात होते कपाटे आवरायला. Netflix वर organising skills च्या वेबसीरिज बघून विशेषतः मरी कोंडो ला फॉलो करून आवरायची सुरसुरी येतेच. मला तिचा सहा महिने न वापरलेली वस्तू Thank you म्हणून टाकून द्यायचा फंडा फार आवडतो. त्यामुळे कितीही स्वच्छ घर आवरले कि टाकून द्यायला , donate करायला निघतेच काहीतरी आणि ते केले कि मन उगाचच हलकेही होते. पूर्वी पत्रे , जाहिराती , मासिके यायची तेंव्हा कागदी कचरा किती व्हायचा. आमच्याकडे दर रविवारी फाडसाहेबाचा कार्यक्रम असायचा. बिनकामाची पत्रे , याद्या , पे केलेली बिले , आमंत्रण पत्रिका फाडून टाकायचे म्हणून फाडसाहेब. मज्जा यायची टराटरा फाडायला. Stress Buster म्हणतात ते हेच असावे बहुतेक. हे सगळे करून छान घड्या करून कपडे ठेवले. स्वच्छ पुसून कागद बदलून बरण्या मांडल्या , चमचे , गाळणे तारेच्या घासणीने उगीचच जोरात घासले. देव्हाऱ्यातले देवही आमसूल लावून म

२५ तासांचा दिवस!

Image
एखादा दिवस , आठवडा , फार मजेशीर उगवतो. Planner भरगच्च भरलेले असते. तरीही काही नवे दिसले , कळले , कि ते ही करावे वाटते. मग होते काय , रात्र थोडी सोंगे फार! पुरत नाही दिवस , उद्याच्या काळजीने सरत नाही रात्र आणि मग विस्कटते सारेच चक्र. मग मनात येते आजचा दिवस चोवीस ऐवजी पंचवीस तासांचा हवा होता ना! छान थंडी पडायला लागलीय , पाच मिनिटे आजून झोपलो तरी घड्याळाने पाचाचा काटा साडेपाचावर नेऊ नये अशी इच्छा सोमवारी सकाळी होतेच कि , मग वाटते हा अदृश्य तास सकाळीच असावा घड्याळात. कितीही घाई केली तरी निघताना दोन मिनिटे झालेला उशीर , प्रत्येक सिग्नलगणिक मिन्टामिन्टाने वाढला कि वाटते फिरवा कांडी जादूची आणि थांबवा या घड्याळाला. कॉफी पिताना सहज मैत्रीण online दिसते मग एकाला दुसरा असे मेसेज वाढायला लागतात. मेंदूत घड्याळाची टिकटिक वाजत असते पण हात मात्र पुढे टायपत राहतात आणि मग वाटते ' वाढव रे एक तास! ' ( लावरे तो विडिओ च्या चालीवर) . परतीच्या प्रवासात मात्र घड्याळ उलटे चालावे वाटते. २० minutes to home पटकन २ minutes व्हावे वाटते. सगळा स्वार्थीपणा. त्या घड्याळानेही आपल्याच सोयीने वागावे. मन

कम्फर्टर

Image
    गेले आठ दहा दिवस सतत पाऊस पडतोय. Autumn सुरु होऊन महिना झाला असला तरी फारशी थंडी जाणवत न्हवतीच. पण या पावसाने हवेत दोन दिवसापुरता तरी गारवा आणलाच , आणि मग कपाटातल्या जाड पांघरूणाना बाहेर यायचे वेध लागले. रजई , दोहर , गोधडी , doona काहीही म्हणा आहेत हे सगळे कॅम्फर्टर. इथल्या अल्पकाळ टिकणाऱ्या थंडीमुळे हि सगळी पांघरुणे वर्षाचा बराच काळ कपाटात hibernation mode मधेच असतात. त्यामुळे बाहेर निघाली कि डांबराच्या गोळ्या , लवंगा , वेखंड , लव्हेंडर बॉल्स असले असंख्य वास मन भरून टाकतात. वातावरण उबदार करून टाकतात. त्या बिचार्या पांढऱ्याशुभ्र naphthalene बॉल्स ना डांबर गोळ्या का म्हणतात हे एक ना सुटणारे कोडे आहे. समोर येणारी प्रत्येक घटना अनेक आठवणी नेहमीच जाग्या करते. या डांबर गोळ्यांचा वास आणि माझ्या सासूबाईंचे कपाट हे डोक्यातले एकदम फिट समीकरण आहे. त्यांचे कपाट उघडले कि कोणत्याही घडीखालून डांबराच्या गोळ्या निघतच. फारसा आवडीने ना घेतला जाणारा हा वास , आम्हा सगळ्यांच्या आठवणींच्या कप्प्यात कधी जाऊन बसला ते कळलेच नाही. अशा या जपून ठेवलेल्या धुवट साडीच्या गोधडीची सर कोणत्याच पांघरुणाला येणार

दही

Image
ग्रोसरीच्या लिस्टमध्ये दही होते मग नेहमीच्या ओळखीच्या ब्रँडचे योगर्ट उचलले आणि पून्हा एकदा आईची आणि गंजातल्या साईच्या दह्याची , विरजणाची आठवण आली. लहानपणापासून साईच्या दह्याने गच्च भरलेला वाडगा काढून मनापासून दहीदूध भात खाणाऱ्या मनाला कितीही चांगला असला तरी योगर्टचा डबा टोचतोच. मन आणि आठवणी विचित्र असतात. कोणत्या गोष्टीला त्या कुठे नेऊन जोडतील याचा भरवसा नाही. मग चांगले वाईट , स्थळ काळ , अर्थ यांचे भान आठवणींना नसतेच. या दह्याच्या बाबतीत माझे कायम हेच होते. ज्ञानेश्वरीत माउली सांख्ययोग समजावताना एक ओवी  लिहतात. ना तरी जाणिवेच्या आयणी I करीता दधि कडसणी I मग नवनित निर्वाणी I दिसे कैसे II माऊलींची उदाहरणे देऊन समजावण्याची पद्धत , त्यामुळे असे अनेक सुंदर दृष्टांत आपल्याला सापडतात. ओवीचा भावार्थ , शब्दार्थ बराच वेगळा असला तरी मला मात्र वर्षानुवर्ष सकाळी फ्रिज बाहेर काढून ठेवलेले दही , ताकाचा गंज , रवी आणि हळूहळू ते घुसळून लोणी काढणारी आई एवढेच डोळ्यापुढे येते. किती मॅनॅजमेण्ट , प्लँनिंग इन्व्हॉल्व्ह असे या अख्या सोहळ्यात. दूध गरम करून गार केले कि पुन्हा तापवायच्या आत साय काढणे , आधीच लक्षात