२५ तासांचा दिवस!

एखादा दिवस, आठवडा, फार मजेशीर उगवतो. Planner भरगच्च भरलेले असते. तरीही काही नवे दिसले, कळले, कि ते ही करावे वाटते. मग होते काय, रात्र थोडी सोंगे फार! पुरत नाही दिवस, उद्याच्या काळजीने सरत नाही रात्र आणि मग विस्कटते सारेच चक्र. मग मनात येते आजचा दिवस चोवीस ऐवजी पंचवीस तासांचा हवा होता ना!

छान थंडी पडायला लागलीय, पाच मिनिटे आजून झोपलो तरी घड्याळाने पाचाचा काटा साडेपाचावर नेऊ नये अशी इच्छा सोमवारी सकाळी होतेच कि, मग वाटते हा अदृश्य तास सकाळीच असावा घड्याळात. कितीही घाई केली तरी निघताना दोन मिनिटे झालेला उशीर, प्रत्येक सिग्नलगणिक मिन्टामिन्टाने वाढला कि वाटते फिरवा कांडी जादूची आणि थांबवा या घड्याळाला.

कॉफी पिताना सहज मैत्रीण online दिसते मग एकाला दुसरा असे मेसेज वाढायला लागतात. मेंदूत घड्याळाची टिकटिक वाजत असते पण हात मात्र पुढे टायपत राहतात आणि मग वाटते 'वाढव रे एक तास!' (लावरे तो विडिओ च्या चालीवर). परतीच्या प्रवासात मात्र घड्याळ उलटे चालावे वाटते. २० minutes to home पटकन २ minutes व्हावे वाटते. सगळा स्वार्थीपणा. त्या घड्याळानेही आपल्याच सोयीने वागावे.

मनासारखे काम करताना, छानसे पुस्तक वाचताना, मनमोकळ्या गप्पा मारतांना मात्र काटा पुढे सरकूच नये वाटतो त्याला मात्र खूप घाई झालेली असते. पंचवीस जाऊद्या, तेवीस तासातच संपतो तो दिवस.

ब्रिस्बेन पुणे प्रवास चुटकीसरशी संपतो पण पुणे ब्रिस्बेन मात्र पृथ्वी प्रदक्षिणेचा फील देतो. घड्याळ मात्र वेळेवरच असते. आता तर ते अंतर अधिकच लांब लांब झाल्यासारखे वाटतेय. पण उगवेलच एक दिवस पुन्हा चुटकीसरशी तीस तास संपवणारा.

हे घड्याळच सांगतेय सध्या; आजचा हा दिवस पटकन संपेल आणि करावयाचे ठरवलेले बरेचसे राहूनही जाईल. मग करू काय? तर त्यातलेही जे इतके दिवस नाही केले. खरं तर राहूनच गेले ते आधी करायचे. ज्याचे श्रेय त्याला देऊन टाकायचे. स्वतःच्याच घड्याळाच्या काट्यांवर पुढे पुढे चालताना इतर घड्याळांकडे झालेले दुर्लक्ष जरा कमी करायचे. अदृश्य असलेला पंचविसावा तास खरंच दिवसात आहे असे समजून राहिलेल्या गप्पात रमायचे, अंगणात आलेल्या गवतफुलावर घाईने मॉवर फिरवण्याआधी दोन मिनिटे डोळे भरून बघायचे. उद्या करू म्हटलेले सगळे कॉल आजच करायचे,पुस्तकात खूण घालून ठेवण्याऐवजी आजच वाचायचे आणि आजचा दिवस तेवीस कि चोवीस कि पंचवीस तासांचा याचा विचार न करताच उद्याच्या स्वप्नात रमायचे.

मग नक्कीच, आठवड्याच्या शेवटी हिशेब करताना सापडणारच... काय? अहो होते ना या आठवड्यात माझ्या दिवसांना पंचवीस तास.

 


घाईतच हे गेले जीवित, हां हां म्हणता दिवस सरे

करावयाचे केले नाही याची आता खंत उरे

 

जे गेले केल्यावीण वाया अचूक केवळ तेच स्मरे

करावयाचे केले नाही याची एकच खंत उरे.

ब. भ. बोरकर

 

-श्रुतकिर्ती

१६/०४/२०२१

Comments

  1. Agadi kharay. Kadhi kadhi 25 kay 30 tasahi Apure padatat.

    ReplyDelete
  2. Time is not absolute, despite what common sense tells you and me. Time is relative, and flexible and, according to Einstein, "the dividing line between past, present, and future is an illusion". So reality is ultimately TIMELESS.(googled)
    Like our mind thoughts ...

    ReplyDelete
    Replies
    1. Reality is ultimately TIMELESS ... can’t agree more.

      Delete
  3. नेहमीप्रमाणे छान मांडल्यास वेळे संबंधीच्या सर्वांना जाणवणाऱ्या विवंचना, व्यथा आणि कथा 😃❤️ ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. 😁😁वेळेबद्दल कायम तक्रारीच असतात नाही😁

      Delete
    2. 😁😁वेळेबद्दल कायम तक्रारीच असतात नाही😁

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान