Posts

Showing posts from July, 2022

निव्वळ वेडेपणा

Image
ऊन - पाऊस - ढग - थंडी - वारा , चक्र चालूच आहे. या चक्रात मध्येच , एखादा सोनेरी क्षण येतो आणि मान वर   केली की आभाळभर पसरलेले इंद्रधनुष्य दिसायला लागतं.   क्षणापूर्वी तर नव्हते इथे. कधी , कसे , केव्हा , तयार झाले ? वाटत असतानाच जाणवते ;   कायमच तयार इंद्रधनुष्य बघितले की. हळूच एक , एक रंगाची पट्टी ओढली जाते या टोकापासून त्या टोकापर्यंत, अर्ध गोल ब्रश फिरतोय झालेच नाही कधी असे!  आकाश तयार होताना कधी पाहिलं ? गोधडीच्या रंगीबेरंगी तुकड्यांसारखे , ढगांचे , संधी प्रकाशाचे , चंद्र-ताऱ्यांचे तुकडे कुणी जोडताना , उसवताना , शिवताना दिसले कधी ? जंगल , अगदी घनदाट तयार झालं कधी ?  किती झाडे , किती वेली , गवतापासून पार दगडावरचे शेवाळे त्यात उगवले कधी ? मुंग्यांपासून गरुडापर्यंत सगळ्यांची घरटी बनली कधी ? दिसले , जाणवले तेव्हा पूर्णच होते चित्र डोंगराने ,   एवढी उंची गाठलीच कशी ?  टोक त्याचं धारदार बनलंच कधी ? तासले वाऱ्याने कडे कधी ? लक्षात आले तेव्हा तयार होते दृश्य छान   कडाडणारी वीज , ढगामागून निघाली केव्हा ? आवाज आणि प्रकाश ल्याली केव्हा ?  ढगांचे आकार , रंग ,

भेट

Image
  काही भेटी अकारणच लांबत राहिलेल्या असतात. मारुतीच्या शेपटासारखी दोन्ही बाजूंनी अडचणींची यादी तयार असते. ? मनात असेल तर सगळे करता येते , हे याबाबतीत ठार खोटे ठरत असते. मनात असूनही काही वेळा मनच भरपूर सबबी तयार करत असते. काही कारणांवर आपला मुळीच कंट्रोल नसतो आणि काही वेळा कारणंच आपल्याला कंट्रोल करतात. थोडक्यात काय तर भेट टळलेली किंवा टाळलेली असते. टळलेली असेल तर निदान घडवण्यासाठी प्रयत्न तरी केले जातात. टाळायचीच असेल तर चुकून भेटलोच तर , तो अवघडलेपणाचा क्षण फार त्रासदायक होतो.   काही भेटी मात्र जेव्हा होतात , तेव्हा मधला काळ अदृश्यच होतो. मागच्या पानावरून पुढच्या पानावर इतके सहज सोपे असते सगळे. अवघडले पणा नाही. बळेबळेच खोटे खोटे हवा पाणी , ट्रॅफिक , राजकारण असले काही वेळ खात नाही. मूळ मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही. मुद्दा असण्याचीही गरज उरत नाही. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे , बराच काळ ख्वाबिदाची   आणि डोक्यातल्या विचारांची भेटच झाली नाही. टळली का टाळली यात अर्थ नसला ,   तरी डोक्यातले विचार कागद पेनाला टाळून निघून जात होते एवढे नक्की. मेंदू आहे म्हणजे त्यात विचार आहेतच. ते