भेट

 

काही भेटी अकारणच लांबत राहिलेल्या असतात. मारुतीच्या शेपटासारखी दोन्ही बाजूंनी अडचणींची यादी तयार असते.?मनात असेल तर सगळे करता येते, हे याबाबतीत ठार खोटे ठरत असते. मनात असूनही काही वेळा मनच भरपूर सबबी तयार करत असते. काही कारणांवर आपला मुळीच कंट्रोल नसतो आणि काही वेळा कारणंच आपल्याला कंट्रोल करतात. थोडक्यात काय तर भेट टळलेली किंवा टाळलेली असते.

टळलेली असेल तर निदान घडवण्यासाठी प्रयत्न तरी केले जातात. टाळायचीच असेल तर चुकून भेटलोच तर , तो अवघडलेपणाचा क्षण फार त्रासदायक होतो. 

काही भेटी मात्र जेव्हा होतात, तेव्हा मधला काळ अदृश्यच होतो. मागच्या पानावरून पुढच्या पानावर इतके सहज सोपे असते सगळे. अवघडले पणा नाही. बळेबळेच खोटे खोटे हवा पाणी, ट्रॅफिक, राजकारण असले काही वेळ खात नाही. मूळ मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही. मुद्दा असण्याचीही गरज उरत नाही.

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे , बराच काळ ख्वाबिदाची  आणि डोक्यातल्या विचारांची भेटच झाली नाही. टळली का टाळली यात अर्थ नसला,  तरी डोक्यातले विचार कागद पेनाला टाळून निघून जात होते एवढे नक्की. मेंदू आहे म्हणजे त्यात विचार आहेतच. ते आहेत म्हणजे त्यात भरकटणेही  आहेच. फक्त कधी ते बाजूला पडत गेले ते कळलेच नाही.

ते विचार फक्त मेंदू करत होता म्हणून बाजूला पडले का? मन त्यात असते तर ही भेट घडलीच असती का ?

असे प्रश्न पडले की समर्थ रामदास फार मदतीला येतात.  “कल्पना रहित जाणीव अंतकरणातून होते. तिला हो /नाही  च्या दोलायमान स्थितीतून मन नेते.  त्यातून अनुमान काढून निश्चयाचे रूप बुद्धी देते. आणि हा निश्चय झाला की चित्त त्याचे चिंतन करते. मग हे कार्य मी करीन हा आग्रह तयार होतो आणि कार्य घडते.”

 हे त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत सांगितलेले, डोक्यात लख्ख प्रकाश पाडून जाते.कधीतरी कोणतीतरी कडी निखळली की सगळेच थांबते.  हेच तर घडले होते.

 मग करावे तरी काय? काहीच नाही. जशी एखाद्या दिवशी एखादी कडी निखळते, तशीच एखाद्या दिवशी, एखादा विचार, घटना,  प्रसंग , माणूस , भावना ती जोडूनही देते आणि मग या सगळ्यांची भेट घडायची थांबवू म्हटले तरी थांबवता येत नाही.

- श्रुतकीर्ती

२२/०७/२०२२







Comments

  1. I missed you Khwabida, welcome back xx ♥️💕 - Kalyani

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, I missed all this too.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान