कंटाळा


वादळ येणार करत करत, हुलकावण्या देत, काळजी, चिंता वाढवत,  आले आणि गेले. नुकसान, त्रास आणि आवरायला खूप पसारा मागे ठेवून गेले.  काहींना जन्मभराची आठवण तर काहींना चर्चेला गोष्टी देऊन गेले.  त्याआधीची तयारी,  नंतरची आवरावरी यात वादळाची गती मंदावल्याने भरपूर दिवसाची गॅप होती. जी बऱ्याचदा काही तासांचीच असते,  त्यामुळे हाताशी वेळही भरपूर होता. अगदी काळजीतून कंटाळ्याकडे जाण्या एवढा.

तसाही कंटाळा इतर कशाहीपेक्षा पटकन जाणवणारी भावना.  त्यामुळे सायक्लॅानची वाट पाहत असताना, आता काय करू? असे अनेकांप्रमाणे माझेही झाले. 

अशा वेळी रिकामा मेंदू आणि विविध चविंची सवय झालेली जीभ,  तयारी म्हणून भरून ठेवलेला भरपूर किराणा आणि हाताशी अगदी फिंगर टीप वर अवेलेबल असणाऱ्या असंख्य रेसिपी.त्यामुळे फुड ब्लॉग्स वाचणे, व्हिडिओ बघणे आणि  काहीतरी वेगळे खायला करणे हे पर्याय मेंदू पटकन स्वीकारतो.  बाहेरची परिस्थिती जोपर्यंत आपल्या गळ्याशी येत नाहीये तोवर जेवायला तर लागणारच ना. मग त्यातल्या त्यात तोच विरंगुळा,  तेच डिस्ट्रॅक्शन.  असे म्हणत काहीतरी नवीन केले जात होते. कोविड मधली डल्गोना कॉफी, घरी केलेले पावभाजीचे पाव, रंगीबेरंगी पाणीपुरीचे पाणी हे सगळे असेच  तयार झाले होते. 

अन्न वस्त्र निवारा या क्रमातही अन्न पहिल्या क्रमांकावर येते, हे यामुळेच. डोक्यातून खाण्याचा विचार जाणे हे जरा अवघडच. सगळे व्याप त्या एका जेवणासाठीच. म्हणूनच कितीतरी चवी ढवी  , कितीतरी प्रकार आणि त्यांची सहज उपलब्धता. कुठे काय छान मिळते? ते खायला तिथे कधी?कसे?जावे  या पासून  ते जाता येत नसेल तर ते घरी अगदी तसेच कसे करावे? हे सगळे सहज शोधात उपलब्ध असते. पदार्थांचे रिल्स,  व्हिडिओ, यापूर्वी रेसिपी आणि पदार्थाच्या वर्णनांचे लेख,मासिक व पुस्तके त्याहीपूर्वी शिळोप्याच्या गप्पांच्या ओघात पाककृतींची टिप्सची देवाण-घेवाण हा ओघ अखंड चालूच आहे.


प्रत्येकाचा आपला आपला एक आवडता शेफ, फुड ब्लोगर फूड, इनफ्लुएन्सर असतोच असतो. या ठिकाणचा अमुक ढमक पदार्थ फक्त तिथेच खावा पासून ही रेसिपी फसायची  नसेल तर अमुकतमुकचीच  रेसिपी वापरावी हा आपल्या मेंदूचा खाद्य प्रवास चालू असतो. पदार्थ कसा करा यापेक्षाही कुठे खा आणि त्यांचे तोंडाला पाणी सुटणारे वर्णन करणारी महाराष्ट्र टाइम्स मधली संजीव साबडे यांची  खाद्ययात्रा माझ्यासाठी असे लिखाण वाचण्यातली पहिली आठवण. तोवर कधी न पाहिलेली मुंबईतली ही ठिकाणे न ऐकलेले पदार्थ हे  पाचवी सहावीतल्या मुलीसाठी वेगळेच जग  होते.  नंतर त्यात अनेकांनी भर टाकली दुर्गा भागवत यांच्या खमंग ची पारायण करून आजही कंटाळा येत नाही की सरोजिनी बाबरांच्या भोंडला भुलाबाईच्या पुस्तकातली गाणी बाजूला ठेवून खिरापतींची वर्णने वाचण्यातला आनंद कमी होत नाही. वय वाढले अनुभव विस्तारले आणि यात मार्था स्टुअर्ट ते कायली कॉंग या सगळ्यांची भर पडली. संजीव कपूर ते रणवीर ब्रार अनेकांनी भारतीय पदार्थांचा खजिना समोर ठेवला. Yan can cook ते Good chef bad chef असल्या असंख्य शो मधून वेगळेच जग समोर आले. कुणाचे लेखन,  कोणाचे सादरीकरण, कोणाचे वागणे बोलणे तर कुणाचे दिसणे. कधी काय आवडले आणि यादीत भर पडत गेली ते कळलेच नाही. फूड ब्लोगर्स आले आणि सायली राजाध्यक्ष पासून झालेली सुरुवात अगदी निवडून वेचून जगातल्या कानाकोपऱ्यात  एकाच रंगाचे पदार्थ करणाऱ्या इंगा  लॅम पर्यंत पोहोचली.

 हे सगळे बघण्यात वाचण्यात कधी कधी करून खाण्यात जो आनंद मिळाला आणि मिळत राहील त्यानेच या सायक्लोन अल्फ्रेड सारख्या घटनांना काही काळासाठी तरी विचाराच्या मागे टाकण्याची ताकद मिळते. आणि काय करू खायला आज? हा जागतिक प्रश्न सोडवायला घेतला की बाकी सगळे प्रश्न सोपे होऊन जातात.

- श्रुतकिर्ती

- ⁠१०/०३/२०२५



Comments

Popular posts from this blog

विसर्जन

थांबा जरा !

नांव ठेवतांना