दही

ग्रोसरीच्या लिस्टमध्ये दही होते मग नेहमीच्या ओळखीच्या ब्रँडचे योगर्ट उचलले आणि पून्हा एकदा आईची आणि गंजातल्या साईच्या दह्याची, विरजणाची आठवण आली.

लहानपणापासून साईच्या दह्याने गच्च भरलेला वाडगा काढून मनापासून दहीदूध भात खाणाऱ्या मनाला कितीही चांगला असला तरी योगर्टचा डबा टोचतोच. मन आणि आठवणी विचित्र असतात. कोणत्या गोष्टीला त्या कुठे नेऊन जोडतील याचा भरवसा नाही. मग चांगले वाईट ,स्थळ काळ ,अर्थ यांचे भान आठवणींना नसतेच. या दह्याच्या बाबतीत माझे कायम हेच होते. ज्ञानेश्वरीत माउली सांख्ययोग समजावताना एक ओवी  लिहतात.

ना तरी जाणिवेच्या आयणी I करीता दधि कडसणी I मग नवनित निर्वाणी I दिसे कैसे II

माऊलींची उदाहरणे देऊन समजावण्याची पद्धत, त्यामुळे असे अनेक सुंदर दृष्टांत आपल्याला सापडतात. ओवीचा भावार्थ, शब्दार्थ बराच वेगळा असला तरी मला मात्र वर्षानुवर्ष सकाळी फ्रिज बाहेर काढून ठेवलेले दही, ताकाचा गंज, रवी आणि हळूहळू ते घुसळून लोणी काढणारी आई एवढेच डोळ्यापुढे येते. किती मॅनॅजमेण्ट, प्लँनिंग इन्व्हॉल्व्ह असे या अख्या सोहळ्यात. दूध गरम करून गार केले कि पुन्हा तापवायच्या आत साय काढणे, आधीच लक्षात ठेवून काढलेल्या विरजणात मिसळून आंबट न होण्याची काळजी घेत दही वीरजणं. दह्याचा वाडगा भरला कि ताक करणे पण लक्षात ठेवून पुन्हा विरजण लावणे. लोण्याचा गोळा काढून घट्ट ताक (पाणचट ताक हि कल्पनाच तिला मान्य नाहीय.) सगळ्यांना ते प्यायला लावणे. या सगळ्यात तिचे ते लोण्यासारखे मऊसूत पण थकलेले हात आजही busy असतात.

या वीरजणाची मज्जाच असते. मध्ये एका लेखात ब्रेड चा mother dough कसा preserve केला जातो. प्रत्येक बेकरचा तो कसा खास असतो त्यावरून चवी कश्या बदलतात. कोणत्यातरी बेकरीत तो कसा चार पिढ्यानी पुढे चालवत आणला आहे हे सांगताना विरजण रेफेरन्सला वापरलेले. ते कसे कुठून कुठे प्रवास करते ताजे दही असले तरी विरजण जुनेच असते याची जोड दिलेली सापडली आणि त्याचे महत्व लक्खकन जाणवले. शेजार्याला विरजण देणे आणि हक्काने विरजण मागणे हि घरोबा असण्याची मोठ्ठी खूण. दूध डेअरीतून दही आणून विरजण लावणे म्हणजे तुमचे शेजार्यांशी पटत नाही असाच अर्थ काढला जाई. आई, आजी अश्या कर्त्या बायका त्या दुभत्याच्या कपाटाला जीवापाड जपत. जाळीचे स्पेशल कपाट , चिनीमातीच्या खास सट, लोण्याचे भांडे,लाकडी रवी, कितीतरी आठवणी त्या पॉट सेट योगर्ट च्या डब्यात मावणार तरी कोठून.

 मीही ऊन पडले कि दही लावते. इंडियन स्टोर मधल्या कोणत्या दह्याचे विरजण छान लागतेय, त्याला उबदार जागी ठेव, हेच दूध वापर, तेच भांडे घे असे अनेक सुगरणीचे हमखास यशाची गुरुकिल्लीवाले सल्ले ऐकल्याने ते लागतेही. पण ती चव मात्र कधीच येत नाही. सुट्टीत पुण्याच्या घरी पोचले कि जेवायला कितीही आवडीचे असले तरी शेवटी हळूच दह्याचे भांडे पुढे करून, दहीभात खा ग! खाराची मिरची वाढते हे ऐकले कि जग जिंकलेला अलेक्झांडर जेवढा आनंदी नसेल तेवढा आनंद वाटतो. आणि पोट मनापासून भरते.

खरेतर कधीही दहीभात खाल्लातर आठवणींनी पोट भरतेच हे आपले मनाचे चोचले, आईची आठवण यायला एक निम्मित.




श्रुतकिर्ती

०२/०४/२०२१


Comments

  1. ह्या लेखावरून, मला कोणीतरी फार पूर्वी विचारलेला प्रश्न आठवला, "भारतातला कुठला खाद्यपदार्थ miss करतेस?", इतक्या वर्षानंतर उत्तर तेच आहे. "लोणी".
    लग्न व्हायच्या आधी, ताक घुसळण्याचे काम माझ्याकडे होते. ते घुसळताना, कोणत्या क्षणी थांबायचे आणि मग थंड पाणी घातले की लोणी चांगले टरारून तरंगायला लागते, तो क्षण नेमका साधणे हे खरे कौशल्य असते. त्यातल्या" involvement मुळे ते छान जमते. तो आत्मानंद काही औरच!! 😃 ♥
    श्रुती, तुझ्या लिखाणाने मला त्या आनंदात नेऊन ठेवले. ~~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. लोण्याची तीही सायीच्या दह्याचे रवीने ताक करून काढलेले .. त्याची सर 🧈. ला नाहीच.....
      लोणी येण्याचा आनंद 👌हेच छोटे छोट क्षण सगळ्यात मौल्यवान असतात thank you.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान