नांव ठेवतांना
एका व्हिडीओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या तीन गिनीपिग्जची नावे ठेवायला मदत करा असे त्यांची मालकिण सांगत होती आणि नावांचा पाउस कमेंट्समध्ये पडत होता.
त्या एक दिवसाच्या पिल्लांकडे बघून कुणाला एक वाटत होते तर कुणाला दुसरेच. रंग, रूप, attitude, आकार आवाज असे सगळे पाहून मजेमजेशीर नावे समोर येत होती. नांवे काय ठरली ते नंतरच्या व्हिडीओत कळणार होते पण ती ठरवण्याची पध्दत मजेशीर होती.
मग मनात आले, प्रत्येक गोष्टीला निदान एक नांव आहे. कसे ठेवले गेले ते? कुणी ठेवले? कां? आणि मुख्य म्हणजे तेच कां? अगदी लहानपणी प्रश्न पडतो.. टेबलाला टेबलच का म्हणायचे तसे. प्रत्येक शब्दाला, नावाला काहीतरी उगम असतो. कोणत्यातरी भाषेतले काहीतरी मुळ रूप असते बरा वाईट अर्थ असतो . प्रत्येक नावाची प्रचलित नावापर्यंत येवून पोचण्याची कथा वेगळीच असते.
ती कळली की सगळे कोजे सुटल्यासारखे वाटते.
नावात काय असे कितीही म्हटले तरी नावातच सगळे दडलेले असते. सिकंदर म्हटला की घोडाच डोळ्यापुढे येतो मांजर नाही. मांजराला ते नांव ठेवायला काही हरकत नाही पण एखादे सिकंदर मांजर भेटेपर्यंत डोळ्यापुढे मांजर काही येतच नाही.
माणसांचेही असेच होते. नाव कानी पडताच डोळ्यापुढे आणि मनात काहीतरी रूप आकार घेते भले प्रत्यक्षात प्रतिमा काहीही असो. स्लॅंगमधे कॅरन वापरायला लागल्यापासून कितीतरी चांगल्या कॅरनना वाईटपणा आला तसा.
झाडांच्या नावांचीही कधी कधी गंमतच वाटते. ही मोठी मोठी बॅाटेनिकल नेम्समुळे अपरिचित वाटणारी झाडे कॅामन नेम कळले की हे तर रोजचेच अगदी जवळचे असे वाटणारी निघतात. अवघड अवघड वाटाणारी ही लॅटीन नेम्स लक्षात राहीली की मजेशीर असतात. लाजाळूच्या नाजुकश्या जांभळ्या फुलांच्या रोपाकडे पाहीले की उगीचच मनात कधीच्या काळी शिकलेला Mimosa Pudica चा आवाज मनात डोकावून जातो. शंकासूर आणि Cesalpinia ही दोन्ही भारदस्त नावे असणारे फुल आगदी नाजूक असते ही गंमत विसरताच येत नाही.
२५,३०,१/२,९७/६ असे नंबर आणि रस्त्याचे नाव अशा घरांपेक्षा घरातल्या प्रत्येकाच्या नावातले अक्षर, याची कृपा त्याचा आशिर्वाद अशी नावे असलेली घरे पटकन लक्षात राहतात तीही त्या नावाच्या गोष्टीसकट.
तांबू गाय, मोती कुत्रा, रामू पोपट जसा घरोघरी , शुरसेन राजपुत्र आणि गुलबकावलीचे फुल प्रत्येक परिकथेत तसेच M.G. Road, टिळक आणि नेहरू चौक प्रत्येक गावात तरीही प्रत्येकाचा इतिहास वेगळा.
प्रत्येक काळात ठराविक नावे खुप पॅाप्युलर होतात. अचानक एकाच वयोगटाची एकाच नावाची माणसे दिसायला लागतात. मग नव्या नावांची लाट येते ती नावे सगळीकडे हे चक्र चालूच राहते. या सगळ्यात एखादेच कोणतेतरी वेगळेच नवेजुने नाव यादीत येते आणि वेगळेपणामुळे ते सगळ्यांच्याच लक्षात रहाते.
मग लक्षात येते या लक्षात राहण्यासाठीच तर केलेला असतो नाव ठेवतांनाच सगळा अट्टाहास … आता तर त्या गिनिपिग्जची नावे नक्की लक्षात राहणार.
- श्रुतकिर्ती
- ३०/०८/२०२४
Comments
Post a Comment