थांबा जरा !

कितीदा सांगतेय थांबा जरा,

हा ढीग वाढतच जातोय खरा

वेळ नाहीय सध्या मला,

वाचू, समजू …समजून उमजून वाचू ?

का ठेवून देवू तसेच? 

काहीच कळेना गोंधळच झाला


क्षण काही निवांत असेच मिळूदे,

सगळे भोवताल जणू धूसर धूसर होउदे

अनुभवाची त्रिज्या जरा विस्तारूदे,

माझ्यात डोकावायला माझ्यातून  बाहेर तर पडूदे


त्या शब्दांची जादू मग खरी कळेल,

भूरळ घालेल मनावर अन् कब्जा करेल

त्यातच शोधेन मग छोटेसे जग,

हरवून जातील शंकाकुशंकांचे ढग


त्यातच मिळेल मला माझे हसणे;

लिहणे, वाचणे, बोलणे आणि शांत बसणे

जगणे शोधेन त्यात आगळे वेगळे,

सापडेलही  हळू हळू सगळे


कळलेय मला त्या ढिगाने सांगितलेले,

आजून बरेच काही वाचायचे राहीलेले

पण तरीही, थांबा जरा पुस्तकांनो 

थोडा वेळ हवाय मला….

अत्ताच आणखी एक काम आलेय!


- श्रुतकिर्ती

- १७/०५/२०२४



Comments

  1. क्षण काही निवांत असेच मिळत राहुदे. 😀 ~ कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विसर्जन

नांव ठेवतांना