विसर्जन

 

सालाबाद प्रमाणे गौरी गणपती आले. आनंद वाटून परत निघाले. विसर्जनाचे दुःख कायमच असते,  ते यावेळी जरा जास्तच वाटले. कारण होते गौरींचे नवे मुखवटे.

22 -23 वर्षानंतर गौरीचे नवे मुखवटे यंदा आणले. आणायचे ठरवल्यापासूनच नवे कसे आणायचे आणि त्याहीपेक्षा कसे नकोत याच्या चर्चांना उत आला. घरातल्या प्रत्येकाच्या मनातल्या आणि डोळे मिटल्यावर डोळ्यापुढे दिसणाऱ्या आमच्या महालक्ष्म्या बदलून आता नवे रूप डोळ्यात साठवायचे होते. तो विचार मनाला जडच जात होता. 

पुण्याच्या बाजारपेठा जून पासूनच विविध मुखवट्यांनी फुलून गेल्या, हे इथे बसून व्हिडिओ पाहून कळत होतेच. त्यांच्यातही विविध फॅशन ट्रेंड आहेत हेही जाणवले होते. इतक्या वर्षात घाट, वळण, मटेरियल बदलणार हे कळत होते पण वळत नव्हते. सगळेच मुखवटे एकाहून एक सरस. आपल्या गौरी म्हणून घरी कोणाला आणणार?

 आणायला जाणार्याचा कस लागणार होता. ढोबळ मानाने रंग, डोळे, केसाची ठेवण, दागिने घातलेले, का न घातलेले?कुंकू गोल का चंद्रकोर?  असे सगळे ठरवले गेले. पण एवढ्या सगळ्या चेहऱ्यात आपले आधीचे मुखवटेच शोधणे सारखे चालू होते.  दुकानातून फोटो,  व्हिडिओ कॉल, त्या गर्दीत फारसे काही न उमजणे यातून शेवटी आता फोन कॉल नको तू तुझे ठरव आणि घे असे ठरवून मुखवटे घेतले गेले. ते पॅक होऊन विमानातही बसले, घरी आले. 

पहिल्यांदा उघडल्यावर आवडले का? या प्रश्नावर कोणाकडेच काही उत्तर नव्हते. मुखवटे सुंदर, रेखीव, नाजूक सगळे काही होते पण अजून त्या आमच्या महालक्ष्मी नव्हत्या ना आवडायला.

यथावकाश गौरी मांडल्या गेल्या. पूजा झाली. त्या प्रसन्न सुंदर दिसायलाही लागल्या. बघणाऱ्या आम्हा सगळ्यांना खूप छान वाटायला लागल्या, पण डोक्यातून आधीचे रूप काही जात नव्हते. खाली राशींवर आधीचे मुखवटे मांडलेले होते. डोळे सारखे तिकडे वळत होते.

आता त्या खालच्या मुखवट्यांवर नेहमीच हसू नाही असे उगाचच वाटायला लागले. “ईदं न मम् “ वाला गंभीर भाव ल्यायलेले ते  आधीचे मुखवटे तर प्रसन्न हसणारे, सगळीकडे डोळे भरून पाहणारे नवे मुखवटे. असा मनात येणारा विचारच समोर दिसत होता. का तो मनाचा भास होता ? हे कळेना. 

विसर्जनाच्या अक्षदा टाकल्या. “ पुनरागमनायच”म्हटले आणि डोळ्यातून दोन अश्रू जास्तीचे आले. 

चारही मुखवटे अजूनही शांत प्रसन्न सुंदरच होते. मन अशांत होते ते माझेच. विसर्जन डिटॅचमेंट शिकवते म्हणतात. आधीच्या मुखवट्यांनी तर ते पूजा केली तेव्हापासूनच प्रात्यक्षिक करून दाखवले होते. समजत नव्हते ते केवळ मलाच. समजायला थोडा वेळ जाणारच होता. डोळे बंद केल्यावर महालक्ष्मी म्हणून नव्यारूपातील देवी डोळ्यापुढे यायला मन मेंदू थोडा वेळ घेणारच.  बदल पचवणे सामान्य माणसाला अवघडच नाही का?पण सुरुवात मात्र मुखवट्यांनी करून दिली होती. आवरून झाल्यावर  नवे मुखवटे हळूच कापसात गुंडाळून ठेवतांनाच मनाला पुढच्या वर्षीच्या गौरींचे वेध लागले होते.

मन मेंदू पुढे निघाले होते, विसर्जनाच्या तबकातील जुने मुखवटे हसाताहेत असेही वाटत होते आणि आता तो भास नाही हे मला पक्के ठाऊक होते.

- श्रुतकिर्ती

- ⁠१३/०९/२०२४












Comments

Popular posts from this blog

थांबा जरा !

नांव ठेवतांना