जळमटे

 

दिवस फार मजेशीर आहेत सध्याचे. मनाच्या शांत डोहात खळबळ माजायला एक छोटासा दगड पुरेसा ठरतो. आणि मग तरंग उठतच राहतात. मग अस्वस्थ मन रिकामी कामे शोधतच राहते. हे आवर ते आवर ... शोधून शोधून उकरून कामे काढावीशी वाटतात.

मग सुरवात होते कपाटे आवरायला. Netflixवर organising skills च्या वेबसीरिज बघून विशेषतः मरी कोंडो ला फॉलो करून आवरायची सुरसुरी येतेच. मला तिचा सहा महिने न वापरलेली वस्तू Thank you म्हणून टाकून द्यायचा फंडा फार आवडतो. त्यामुळे कितीही स्वच्छ घर आवरले कि टाकून द्यायला, donate करायला निघतेच काहीतरी आणि ते केले कि मन उगाचच हलकेही होते.

पूर्वी पत्रे, जाहिराती, मासिके यायची तेंव्हा कागदी कचरा किती व्हायचा. आमच्याकडे दर रविवारी फाडसाहेबाचा कार्यक्रम असायचा. बिनकामाची पत्रे, याद्या, पे केलेली बिले, आमंत्रण पत्रिका फाडून टाकायचे म्हणून फाडसाहेब. मज्जा यायची टराटरा फाडायला. Stress Buster म्हणतात ते हेच असावे बहुतेक.

हे सगळे करून छान घड्या करून कपडे ठेवले. स्वच्छ पुसून कागद बदलून बरण्या मांडल्या, चमचे, गाळणे तारेच्या घासणीने उगीचच जोरात घासले. देव्हाऱ्यातले देवही आमसूल लावून मन लावून उजळले कि छान वाटायला लागते. सगळे आवरून चित्रातल्या सारखे घर दिसायला लागले कि डोक्यातल्या गोंधळाची जळमटेही आपोआप स्वछ होतात. झाडांची वाळकी पाने काढून, तण उपटून जरा फांदया बिन्द्या कापल्या की आपल्यालाही हुशारी येते.

मधून मधून मनस्वास्थ्य जपायला ही थेरपी चांगली कामी येते. बरं साईड इफेक्ट म्हणून स्वछ घरही मिळते.

आज आसच काहीसे करताना मनात एक विचार डोकावला; कपाटांची घरांची स्वच्छता पुनर्मांडणी सजावट करतो तशी मधून मधून मनाचीही करावी. मरी कोंडोचा सल्ला ऐकून सहा महिने जे विचार, जे राग लोभ, ज्या इच्छा, जी माणसे मनात आले नाहीत ते ज्या कोपऱ्यात आहेत तिथून त्यांना बाहेर काढून Thank You म्हणून सरळ हाकलवून द्यावेत आणि पुन्हा येऊ नका म्हणून सांगून सावरून. मग नव्या विचारांना, नव्या स्वप्नांना, नव्या माणसांना जागा होईल. घर आवरताना धूळ झटकावी तशा मेंदूतल्या काळज्या, चिंता झटकून दूर कराव्यात. स्वच्छ पुसून सगळे चकचकीत करावे. निकोप निरोगी मन तरी मिळेल हे केल्यावर.

आजतरी कपाटे यावरून मनावरचे मळभ दूर झालेय पुढच्या वेळी मात्र मनाचाच कोपरान् कोपरा झाडून पुसून घ्यावा म्हणतेय.




सुखासीन जगण्याची झाली जळमटे

जगणेच सारे पुरे झाडायला हवे…..कधीतरी वेड्यागत वागायला हवे

संदिप खरे

 

-श्रुतकिर्ती

२४/०४/२०२१

 

 

Comments

  1. खरंच! मनातली जळमटे रेग्युलरली झाडली पाहिजेत.... आणि त्या कोळ्याचा पण शोध घेतला पाहिजे! जो ही जळमटे विणीत असतो.
    त्या कोळ्याला मनातूनच बाहेर काढायला हवे. हृदयात जायच्या आधीच. ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. ह्रदयात जायच्या आधी हे महत्वाचे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान