झळ

 

रोजचा दिवस नवीन बातमी घेऊन उजाडतोय. खरे म्हणाल तर जुनीच बातमी अजून त्रासदायक करून दाखवतोय. कितीही असंवेदनशील असलेले मन सुद्धा याकडे तटस्थपणे बघू शकणार नाही. रोजच्या जगण्यात दुःख हे असतेच एक हिस्सा म्हणून, सध्याच्या प्रसंगापेक्षाही वाईट प्रसंग येऊन गेलेले असतात वैयक्तिक आयुष्यात. मग याच वेळी याचे परिणाम इतके खोल का होताहेत?

आजूबाजूला कोणी गेले, गंभीर आहे कळले कि त्याचा परिणाम इतका जास्त का होतोय?

एकदा वाटले कि दुःखाने इतकी समोरून धडक दिलीच न्हवती कां कधी? तर हो खरंच  खूप फिल्टर्स होते मध्ये,अगदी लहानपणी कुणी वारले कि, बातमी अती सौम्य होऊन मिळायची. बहुदा आईबाबा, आजी आजोबा कुणाच्यातरी घरी जाऊन आलेत. तिथे काहीतरी वाईट घडलेय एवढेच कळायचे. मग कधीतरी मृत्यू हि संकल्पना कळली. जवळचे,नात्यातले,extended family मधले कोणी गेले तरी आई बाबा होते बरोबर धीर द्यायला. दुःखाची तीव्रता कमी करायला. जे झाले ते अपरिहार्य होते. काळापुढे कोणाचे काय चालते इत्यादी सौम्यपणे समजावत. या सगळ्याची झळ कमी करायला.

हळूहळू हे समजावून सांगायची गरज कमी होत गेली. दुसऱ्याला तर कधी स्वतःला धीर देण्याची समजावण्याची जवाबदारी स्वतःवर आली. तरीही आपल्याहून मोठी माणसे आजूबाजूला दिसत,वावरत होती. रोज समोर नसली तरी आयुष्यात होतीच होती. त्यांचे असणेच खूप आश्वासक होते आणि आजही आहेच.

मागची पिढी असणे याने कुठेतरी लहानपण टिकून राहते. आपल्या आणि सगळ्या संकटांच्या, नेगेटिव्हिटीच्या मध्ये कोणीतरी ठामपणे उभे आहे याची जाणीव प्रत्येक नव्या धाडसाचा,निर्णयाच्या मागे नकळत असतेच असते.

झुंडीने येणारी सध्याची संकटे या सगळ्याच्या चिंध्या करताहेत. आजूबाजूला असणारी वडीलधारी काळाच्या पडद्याआड झपाट्याने जाताहेत. आपले वय पुढे चाललेय याची प्रकर्षाने जाणीव होते जेंव्हा; जे आपल्या आणि दुःखाच्या मध्ये उभे होते त्यांना दुःखाची झळ लागू नये याची काळजी घेण्याचे प्रयत्न, प्रत्येक बातमी गाळून गाळून सांगताना होते. रोजच्या भयानक बातम्यांनी दुःख बोथट होत नाहीच पण मनाची दुःख सामावून घेण्याची क्षमता तेवढी वाढतेय. हे वास्तव आहे, ज्याचे त्याचे कर्मभोग असतात या सगळ्या थेरी मान्य आहेत आणि पटलेल्याही आहेत. पण तरीही प्रत्येक बातमीबरोबर नव्याने दुःख जाणवतेच आणि आयुष्यात जे जे शिल्लक आहे त्याबद्दलची कृतज्ञताही पुनःपुनः तीव्र होत जाते.

माझी आणि मला वाटते, आपल्या प्रत्येकाची जरी कुणाच्याच आयुष्यात वाईट घडू नये अशी कायमच इच्छा असली तरी, आपले दार दुःखाने कधीच ठोठावू नये असेच कायम वाटतेच कि.

परदुःख शीतल हा जरी मनुष्यस्वभाव असला तरी जेव्हा आजूबाजूला इतके गंभीर वातावरण असते तेव्हा फक्त ज्ञानेश्वर माउलींना शरण जावे आणि म्हणावे,

जो जे वांछील ते ते लाहो प्राणिजात I



 

-श्रुतकिर्ती

३०/०४/२०२१

Comments

  1. सद्यपरिस्थितील हरेकाची मानसिकता अगदी बरोब्बर व्यक्त केली आहे .👍👌💐

    ReplyDelete
  2. सद्यपरिस्थितील हरेकाची मानसिकता अगदी बरोब्बर व्यक्त केली आहे .👍👌💐

    ReplyDelete
  3. सगळेच निःशब्द. सगळ्यांनाच झळा लागत आहेत. Mind numbing experience indeed. ~ CK.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान