“मी पण!”

काल मैत्रिणीने एक व्हिडिओ पाठवला. प्राण्यांच्या मनातले जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद करणाऱ्या एका ॲनिमल कम्युनिकेटर किंवा व्हिस्पररचा. छानच होता. लगेच बोलता बोलता हीलर, ॲारा रिडर असे सगळे विषय चर्चेत आले. हे सगळे खूप इंटरेस्टिंग आहे वाटायला लागल्याने आणखीन चार दोन व्हिडिओ पाहिले. AI च्या कृपेने लगेच ऑनलाईन कोर्सेस च्या जाहिराती दिसायला लागल्या आणि आपणही हे करून बघावे असे मन मांडे खायला लागले. मनातलेच मांडे पटकन तयार झाले आणि डोळ्यापुढे पार क्रिस्टल बॉल, धूर, रंगीबेरंगी स्टोन्स आणि मध्ये मी असले चित्र दिसले.

तेवढ्यात,  दुसऱ्या एका मैत्रिणीने रिकाम्या डब्यात चार लाडू घालून पाठवले होते ते आठवले. मैत्रिण सुगरण. मिठाया खाव्यात तर तिच्याच हातच्या. त्यामुळे पटकन लाडू तोंडात टाकला आणि आपणही डिंक आणून ठेवलाय विकेंडला लाडू करूया. तेव्हा हिलाच विचारू नक्की काय केले, हेही मेंदूने नोंदवून ठेवले.

तिसऱ्या मैत्रिणीची बाग फार छान. कोणतीही काडी तिने जमिनीत रोवावी आणि रोपाने बहरून फुले फळे द्यावीत इतकी तिची हातोटी. तिची फुलेपाने पाहिली की तो विकेंड बाग खुरपण्यात आणि आहे ती चार झाडे खत -माती करण्यात गेलाच म्हणून समजा.

कॉटनची पांढरी, गुलाबी, राखाडी साडी पाहिली रे पाहिली ऐंशिव्या वर्षीही साडी न चुरगळता दिवसभर वावरणारी आई आठवते आणि इस्त्री जरा जोरातच फिरवली जाते.

 गेल्या वीस बाविस वर्षात,  एकही डोसा ताई सारखा जमू दे असे मनातल्या मनात न म्हणता झालाच नाही आणि तिने रंग कॅनवास आणलेला कळला की  गेलाबाजार चार स्केचपेन तरी नवीन आणलीच गेली.

काय आहे हे सगळे? स्पर्धा?  इर्षा ?नक्कीच नाही. हे सगळे जवळचे, किंबहुना जिवापालीकडचे. मग त्यांनी केलेले सगळे करण्याची इच्छा तरी का?तसे जमावे असे वाटणे तरी का? समोरच्यातले चांगले आपल्यात यावे, आपल्यालाही जमावे. त्यानिमित्ताने आपलेही १.१, १.२ व्हर्जन तयार होत रहावे असे वाटत असेल ना. सगळे तर येणार नाहीच.  पण काहीतरी बरे जमावे असेच प्रत्येक वेळी वाटतेच. उत्तमाचीच कॉपी करावीशी वाटते. खरे तर ही कॉपी ही नाही. त्यांच्यातले काहीतरी, आपल्यातल्या कशात तरी मिसळून नवे, आपलाच ठसा असणारे तयार करण्याची आसच यामागे.  हे काहीतरी नविन करण्याची इच्छाच असते जे जगणे पुढे चालू ठेवते.

 मग भले चारातला एकच डोसा चांगला होवो किंवा अंगणातल्या चाफ्याला चार वर्षांनी दोनच फुले येवोत…

-श्रुतकिर्ती

-३०/०७/२०२३



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान