भाजीवाली

 

रविवारच्या असंख्य ठरवलेल्या, 24 तासात 28 तासांची कामे फिट करण्याच्या यादीत भाजी आणि भाजी बाजारातील चक्कर सकाळ सकाळच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये मोडते.

तसेच आज सकाळी भाजी घेताना नेहमीची भाजीवाली घेतलेल्या कोथिंबीर पुदिनाच्या जुडीला थांब  थांब म्हणत पुदिन्याची दुसरी जुडी घेऊन आली. ती मुळे असलेल्या काही काड्या असलेली. कुंडीत लाव आता. स्प्रिंग आला की तुला खूप पुदिना मिळेल, असे तिच्या मोडक्या तुटक्या व्हिएतनामिज इंग्रजीत हात वारे करत करत म्हणाली. कुठला तो भाजी बाजार,  त्यातली माझ्यासारखी अनेक गिऱ्हाईके. ती  बऱ्याच जणांशी असं छान छान वागत असणार. पण मला एकदम स्पेशल असल्याचे भारी फिलिंग आले. आणि रस्ताभर अशा सगळ्या भाजीवाल्यांची आठवण रविवारचा रस्ता पटकन संपवणारी ठरली.

आईच्या दर शनिवारच्या राणी लक्ष्मीबाई मंडईतली चिंगी. एका शनिवारी आईने भरपूर भाज्या थोड्या थोड्या आणि एक वेताची दुरडी घेतल्यावर, काय चाललेय? हा प्रश्न विचारून मुलगी फॅन्सी ड्रेस मध्ये भाजीवाली होते म्हणताच, “त्याच शाळेबाहेर मी बोर चिंचा विकते.माझ्याकडून पानाची चंची आणि कमरेचा पट्टा घे” म्हणाली. आणि खरंच दिलाही दुसऱ्या दिवशी. पाच मिनिटाची, पाच दहा रुपयाच्या खरेदीची ती ओळख. पण त्या चंचीने आणि कंबरपट्ट्याने मुलीला ऑथेंटिक भाजीवाली बनवले. रोज सकाळी नऊ वाजता दारावर भाजी विकायला येणारी भाजीवाली. अगदीच इमर्जन्सी सोडली तर तिच्याकडून भाजी घेणारच नाही हे माहीत असूनही रोज दारावर येणार, हाका मारणार, दोन मिनिटं टोपलं खाली ठेवणार.  उन्हाळ्यात पाणी मागणार आणि अगदी हक्काने आजूबाजूच्या पोरा टोरांना नाहीतर घरमालकिणींना टोपली डोक्यावर चढवायला हात लावायला लावणार.

 नंतर कितीतरी भाजीवाले भेटत गेले. गल्लीतले, कोपऱ्यावरचे ते मंडईतले हजारोंचे व्यवहार करणारे. कधीतरी दोन बिल्डिंग सोडून एक छोटेसे भाजीचे दुकान झाले. इरकली काठापदराची साडी आणि मोठी कुंकवाची चीर लावणारी अव्वा आणि तिची दोन मुले. छान भाजी असायची त्यांच्याकडे.  बऱ्याच दिवसानंतर माझ्या अंगावरचीही टोपपदराची इरकल बघून, “मी अक्कलकोटची राहणारी. तू कुठली?” असे विचारत  तिने  दोन मिनिटांच्या रोजच्या गप्पांची बेगमी केली  आणि एक गिर्र्हाईक पक्के केले. मग माझी चंगळ सुरू झाली. कडवंच्या मिळाल्यात घेऊन जा. तांदूळशाची जुडी  छान आहे. ही कैरी लोणच्याला नाही बरी पन्हे कर ह्याचे  असा खास राखीव सल्ला आणि माल पिशवीत भरला जायला लागला.

 तेही गाव सुटले आणि भाजीवाला हा प्रकारच संपल्यात जमा झाला. शांधायच्या चित्र विचित्र नावे लिहिलेल्या सुपर मार्केटमधल्या कांदे- बटाटे, फ्लॉवर -कोबीला कंटाळल्यावर महाप्रयत्नाने लोकल भाजी बाजार सापडलां.आणि कॅन्टोनिजमध्ये आरडाओरड करत,  रुपयाला दोन” ”ताजी भाजी” असे विकणारे भाजीवाले बघून खजिनाच गवसला.

हिरवा पाला बघितला की घे विकत हा मनाचा साधा हिशोब. नाव माहित नाही. बरे विचारून उपयोग तरी काय?  एक दोनदा तुटक्या मुटक्या भाषेत विचारल्यावर हॉटपॅाट मध्ये टाकतात हे कळल्यापासून,  दिसली हिरवी भाजी की टाक वरणात असा  सपाटाच लावला. दोन-चारदा करून पाहिल्यावर,  हे जमतेय, हे कळल्यावर तो भाजी बाजार आणि महात्मा फुले मंडई एकसारखीच वाटायला लागली. त्या भाजीवाल्यांना मात्र या पाल्याचे काय करता?  असले प्रश्न भाषेच्या अडसरामुळे नुसतेच “निहाव” आणि “श्येश्ये” एवढ्यावरच   उरकले गेले.

इथेही अनेक भाजी बाजार. जगभरातल्या विविध भाज्या. भाषेचा अडसर नाही. गुगल सेवेला हजर. त्यामुळे भाजीवाल्यांशी सुट्ट्या पैशाच्या देवाण-घेवाणी पुरता संबंध.

पण आज मात्र त्या पुदिन्याच्या काडीने पुन्हा सगळ्या भाजीवाल्या आणि मंडया फिरवून आणले.

 रोज जेवायला भाजी लागते आणि ती विकणारे भाजीवाले.  एरवी हे सगळे मनात कधीही न येणारे. या सगळ्या घटनांची दखल नोंद मेंदू घेतच असणार आणि म्हणूनच अशा एखाद्या नकळत नाजूक क्षणी सगळ्या आठवणींनी मनाचा तळ ढवळून टाकतो. मग कधीतरी जगायला काय काय लागते याची यादी केली तर भाजी मंडई आणि त्यातले भाजीवाली यादीत नक्की असतील हेही पक्के मनात आणि मेंदूत नोंदवूनच रविवारचा भाजी बाजार उठतो.

-श्रुतकिर्ती

१६/०७/२०२३



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान