जमतंय…
अरे वा! जमलं की तुला
पटकन म्हणाले कोणीतरी
भारी वाटतेच मग,
विषय असला अगदी आलाणा फलाणा तरी
पण खरे उत्तर शोधलेच तर;
जमवण्याचा प्रयत्नच चालू असतो ना दिवसभर
धडपडून, पडझडून कसेही करून
“जमले की!” हे एकच वाक्य मनाशी धरून
जमलंय का मग खरंच?
प्रश्न पडला कि संपलच
रोजच मग,
जमण्याच्या रस्त्यावर चालत चालत
दूर मनातल्या मेंदूतल्या जंगलात हरवत
जिथे दिशा एकच, वाटा मात्र अनेक
रस्ता अंधारा
मात्र मधूनच सुर्याचा किरण एक
झाडापानांतून झिरपणारा सुर्यप्रकाश
हाताला धरून मार्गांवर चालवतो सावकाश
जमतंय जमतंय सांगाणारे आजूबाजूचे आवाज
मनात मात्र शंकेचीच मोठी गाज
इतके अवघडही नसते प्रत्येकवेळी
पण सोपेही नसतेच तिन्हीत्रिकाळी
नाही,
नाहीच जमले मला बर्याचदा
पण तरीही प्रयत्न चालूच आहे जमवण्याचा
माझे मलाच, मनाने मेंदूला
एकदातरी, “जमले की तूला” म्हणण्याचा…
-श्रुतकिर्ती
१४/०८/२०२३
जे जमायचं असतं जे सगळं जमतंच , nice take on “जमणं” in general 😄 ~ कल्याणी
ReplyDeleteThank you
Delete