काहीतरी राहिलंय!
गणपती गौरींच्या आधीचा वीकएंड आला आणि हळूहळू चाललेल्या तयारीने वेग घेतला. सगळे बिट्स अँड पिसेस जुळून यायला लागले. घर आवरलेले दिसायला लागले आणि सणाचे वातावरण जाणवायला लागले. तशा याद्या , पुन्हा पुन्हा केलेल्या याद्या , खरेदी हे सगळे बरेच आधी चालू असतेच पण वेग येतो तो दोन दिवस आधीच. मेंदू आणि हात भराभर चालतात आणि to do लिस्ट टिक ऑफ व्हायला लागते. एकाच्या जागी चार हात उत्साहात कामाला लागतात आणि दमायला न होताच कामाचा उरक पडतो. पण हे सगळे चालू असताना मन मात्र एकीकडे काहीतरी राहिलंय , काहीतरी विसरलंय असे सारखे सांगत असते. मेंदू आठवायचा प्रयत्न कसून करत असतो पण छे! सगळे झालेय , होत आलेय असेच चित्र कागदोपत्री दिसत असते. "तुला शंकाच जास्त " "टेन्शन आलाय का ? म्हणून असे होत असेल" अशी उत्तरे मिळूनही काहीतरी राहिलंय चा भुंगा काही पिच्छा सोडत नाही. मग शेवटचे अस्त्र निघते. पूजा , व्रत-वैकल्ये आपल्या समाधानासाठी असतात. काही राहिले तरी त्याने फार फरक पडत नसतो. भक्तिभाव महत्वाचा. तो गणपती काही हे राहिले ते राहिले असे म्हणणार नाहीय. असे सगळे सल्ले मिळतात. ते मनाला माहित अस...