वाबी साबी
उन्हाळा आला, सुट्टी आली की प्रवास, भेटीगाठी, गमती जमती याबरोबरच आवरा आवरी नावाचे भूत माझ्या मानगुटीवर बसते. स्प्रिंग क्लिनिंग या गोंडस नावाने ते पार ताबा घेते. सुट्टीत करूया, म्हणून बाजूला ठेवून दिलेले हे काम, जाता येता “सुट्टी आली “ असे कधी हळूच कधी ओरडून ओरडून सांगायला लागते. मग एक दिवस त्याचा मुहूर्त सापडतो. पसारा काढायला फार मजा येते. एक करता करता, दहा गोष्टी आठवतात आणि उठून चालताना, पाय ठेवताना, खाली जागा पुरेना एवढे भोवताली जमा होते. यानंतर येतो खरा गमतीचा टास्क. टाकून देण्याचा, फेकून देण्याचा, याचा उपयोग नाही हे लक्षात येण्याचा. एरवी असे कपडे, किरकोळ सामान, कधीतरी लागते वाले काहीतरी, फिरकी हरवलेले, खडा पडलेले कानातले, संपत आलेली पेनं हे सगळे, “पाच मिनिटात आवरून होईल! निम्म टाकूनच द्यायचे” या गटात मनाने टाकून दिलेले असते. पण आज, यातले प्रत्येक जण आपली गोष्ट घेऊन समोर आले. “हे कधी आणले ? हे कोणी दिले? हे कधी वापरले ? “ त्यावर, कोण काय काय म्हणाले ? असले असंख्य निरुपयोगी विचार तो पसारा संपवूच देत नव्हते. घड्याळ पुढे ज...