वाबी साबी


उन्हाळा आला, सुट्टी आली की प्रवास, भेटीगाठी, गमती जमती याबरोबरच आवरा आवरी नावाचे भूत माझ्या मानगुटीवर बसते. 

 स्प्रिंग क्लिनिंग या गोंडस नावाने ते पार ताबा घेते.

सुट्टीत करूया, म्हणून बाजूला ठेवून दिलेले हे काम, जाता येता “सुट्टी आली “ असे कधी हळूच कधी ओरडून ओरडून सांगायला लागते.  मग एक दिवस त्याचा मुहूर्त सापडतो.

पसारा काढायला फार मजा येते. एक करता करता, दहा गोष्टी आठवतात आणि उठून चालताना,  पाय ठेवताना, खाली जागा पुरेना एवढे भोवताली जमा होते. यानंतर येतो खरा गमतीचा टास्क. टाकून देण्याचा, फेकून देण्याचा, याचा उपयोग नाही हे लक्षात येण्याचा.

एरवी असे कपडे, किरकोळ सामान, कधीतरी लागते वाले काहीतरी,  फिरकी हरवलेले,  खडा पडलेले कानातले,  संपत आलेली पेनं हे सगळे, “पाच मिनिटात आवरून होईल! निम्म टाकूनच द्यायचे” या गटात मनाने टाकून दिलेले असते.

 पण आज, यातले प्रत्येक जण आपली गोष्ट घेऊन समोर आले. “हे कधी आणले ? हे कोणी दिले?  हे कधी वापरले ? “ त्यावर,  कोण काय काय म्हणाले ? असले असंख्य निरुपयोगी विचार तो पसारा संपवूच देत नव्हते. 


घड्याळ पुढे जायला लागले आणि कामाची आठवण या सगळ्याला बाजूला करून आवरावरी पार पाडते.  फेकायचा डोंगर आता टेकडी एवढा झाला असतो.  त्याकडे पाहताना, आठवणी पुन्हा एकदा मनात साठवून ठेवताना,  त्या तुटक्या फुटक्यातली सुंदरता मनाला भरून टाकते.  खडा पडूनही कानातले घालून बघताना, पहिल्यांदा घातले तेव्हाचा आरशातला चेहरा दिसतो. आता बसत नाही म्हणून चॅरिटीच्या गठ्ठ्यात घडी करताना,  तो ड्रेस विकत आणून पार्सल करून इथपर्यंत पाठवणारे हात या क्षणी जणू हातात आहेत असेच वाटू लागते.


या सगळ्या आठवणी साठवून ठेवायची, मनाच्या रितेपणाला घाबरणारी मनाची धडपड एका क्षणात जाणवली. नको त्या आठवणी म्हणताना, त्या नसतील तर काय होईल याची भीषणता ही जाणवली. वस्तूंवर प्रेम नव्हतंच होतं ते आठवणींवर. म्हणून तर विचारांची गोधडी शिवली जात होती आणि जात असते.

जाणवला जुन्यातले, विरलेल्यातला विटलेल्यतला, सुंदर काहीतरी जपून पुन्हा पुन्हा समोर आणण्यासाठी चा अट्टाहास.


आवरून झाले. मनगुटी वरचे भूत उतरले. आता पुढच्या वर्षी पर्यंत ते काही येणार नव्हते.

 मग उरला तो छोटा डोंगर. सुट्टीतले आणखी एक छोटे भूत म्हणजे प्रोजेक्ट्स. आता आवरावरीच्या उतरलेल्या भुताला जणू नवीन आयुष्यच मिळाले. बाजूला ठेवलेले मणी, मोती, कापडाचे रंगीत तुकडे. स्वच्छ धुऊन ठेवलेल्या बरण्या बाटल्या, रंग ब्रश, सुई -दोरे या रूपात ते रिसायकलिंग प्रोजेक्ट च्या नावाखाली परत आले. आणि सगळ्या नव्या पसार्यासाठी  आता मी जागा शोधायला लागले.

तळटीपः वाबीसाबी ही  एक जपानी  संकल्पना आहे. जी तीन सत्य मानते,

Nothing lasts. Nothing is finished and nothing is perfect.


- श्रुतकीर्ती

-१६/१२/२०२३



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान