शून्य गढ शहर…
सध्या रोज ऊन पावसाचे चक्र चालू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी असेच ढगाळलेले , टाचणी टोचली तरी धबाधबा पाऊस पडेल वाली परिस्थिती. रेडिओवर अगदीच ढणढण पंजाबी गाणी लागले. पाऊस पडायच्या ऐवजी , पळून जाईल हीच शक्यता वाटल्याने त्याजागी जमेल ती पहिली प्ले लिस्ट लावली. सुदैवाने पाचव्या सेकंदाला कुमार गंधर्वांच्या आवाजात अवधूता… ऐकू आले आणि हुश्श्य झाले. पावसालाही सुरांची साथ आवडली आणि तो एका लयीत कोसळू लागला. एक दोन गाणी संपली आणि लागले ‘शून्य गढ शहर’ ... फक्त पावसाचा आणि तंबोर्याच्या सूर , आणि त्या जादुई स्वरांत ते निर्गुणी भजन! संत गोरक्षांच्या त्या शब्दांना नुसते ऐकून , पटकन , काय तर विचार करूनही लवकर अर्थ लागत नाही. तशीही या निर्गुणी भजनाची गंमतच असते. दोन स्तरांवर चालणारा प्रवाह असतो तो. शब्द सांगतात त्याला हि सुंदर अर्थ असतो पण त्या पलीकडे साधकासाठी लपलेला अत्यंत गुढ तर्कसंगती च्या कोणत्याही व्याख्येत न बसणारा अर्थाचा खोल डोह असतो. त्यात बुडी मारली की बाहेर येणे अशक्य. एकेका वाक्याच्या दोह्याच्या, पंक्तीच्या भोवर्यात किती वेळ अडकलात , त्याचा ...