शून्य गढ शहर…

सध्या रोज ऊन पावसाचे चक्र चालू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी असेच ढगाळलेले, टाचणी टोचली तरी धबाधबा  पाऊस पडेल वाली परिस्थिती.  रेडिओवर अगदीच ढणढण पंजाबी गाणी लागले. पाऊस पडायच्या ऐवजी,  पळून जाईल हीच शक्यता वाटल्याने त्याजागी जमेल ती पहिली प्ले लिस्ट लावली. सुदैवाने पाचव्या सेकंदाला कुमार गंधर्वांच्या आवाजात अवधूता… ऐकू आले आणि हुश्श्य झाले. पावसालाही सुरांची साथ आवडली आणि तो एका लयीत कोसळू लागला.  एक दोन गाणी संपली आणि लागले ‘शून्य गढ शहर’ ...

फक्त पावसाचा आणि तंबोर्‍याच्या सूरआणि त्या जादुई स्वरांत  ते निर्गुणी भजन! संत गोरक्षांच्या त्या शब्दांना नुसते ऐकून, पटकनकाय तर विचार करूनही लवकर अर्थ लागत नाही. तशीही या निर्गुणी भजनाची गंमतच असते. दोन स्तरांवर चालणारा प्रवाह असतो तो.  शब्द सांगतात त्याला हि सुंदर अर्थ असतो पण त्या पलीकडे साधकासाठी लपलेला अत्यंत गुढ तर्कसंगती च्या कोणत्याही व्याख्येत न बसणारा अर्थाचा खोल डोह असतो.  त्यात बुडी मारली की बाहेर येणे अशक्य. एकेका वाक्याच्या दोह्याच्या, पंक्तीच्या भोवर्यात किती वेळ अडकलात, त्याचा शोध लागत नाही. तसेच काहीसे आजही घडू लागले.

आपल्या मनाला आपणच हुशार हा अहंकार असतोच.  अर्था पलीकडे आणखीन काहीतरी असल्याचे कळल्यापासून मेंदू तो अर्थ खोदून खोदून शोधायला लागतो. गुगल मदतीला असतेच. अनेक अभ्यासकांनी शहर म्हणजे देह, त्यात आत्मा राहतो. ते आत्मस्वरुप कळले कि  अद्वैत भाव कसा नष्ट होतो.  मग त्या इडा पिंगला नाड्या , योगी - त्याचे इंद्रियांवर पहारा करणे. सगळ्याचे अभ्यासपूर्ण चिंतन सापडते.  वाचून 'काय भारी!' वाले फिलिंग येते आणि तेच गाणी मी रिप्ले करते.

आता पावसाने जरा रुद्र रूप धारण केलेय. त्या आवाजात  ते सूर ऐकताना मघाचा गुगल करण्याचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ, रेफरन्स, बघण्याचा उत्साह मावळत चालला आहे. सुरांनी अंगावर शहारा आला आणि बाहेरच्या विजे बरोबरच एक वीज मेंदूतही लख्ख प्रकाश पाडून गेली. मी ऐकत होते ते होते तरी काय? निर्गुणी भजन - निर्गुणाची केलेली भक्ती. ज्याला आकार नाही, रंगरूप नाही त्याची भक्ती करण्यासाठी वापरलेले शब्द. आपण त्या जगन्नियंत्याला जसे विविध रूपात पुजतो, तसे त्याला रूप नाही. तो त्या पलीकडचा आहे. हेही मानतोच मग त्या रूपातून, रूपा पलीकडे जाण्याच्या प्रवासासाठी वापरलेले हे साधन; हे शब्दत्यांचा का अर्थ लावा? त्या अत्यंत अवघड असा अर्थ सांगणार्या शब्दांच्या शब्दार्था च्या जंजाळात का आडका? गोरक्षानां काय म्हणायचे आणि कुमार जींच स्वर काय सांगत आहेत, हे विचार माझ्यासारख्या अल्पमतीने कराच का? निर्गुणाचे भजन, जो कशात बांधला गेला नाही त्याची भक्ती. त्याचा अर्थ शब्दात का बांधा? निर्गुण या शब्दाचा अर्थ त्याचे मर्म; त्या भजनाचा अर्थ शोधतांना मी मीनिंग लेस करून टाकले की काय?

 मग करू काय? ते सूर, ते शब्द, तो पाऊस ते आपापले काम करत आहेत.  मला फक्त त्यांच्यात हरवून जायचे. संपूर्ण शरणागती पत्करायची. मेंदूला जरा बाजूला ठेवून हे सगळे समजे उमजे पर्यंत गाणे संपले. शांतता झाली. लक्षात आले की पाऊसही थांबला होता. आभाळ मोकळे झाले होते. नुसते बाहेरचेच नाही तर मनातलेही. पुढच्या पाण्याने भरलेल्या ढगांची गर्दी दाटून घ्यायला!

- श्रुतकिर्ती

१२/११/२०२१














श्रुतकिर्ती

१२/११/२०२१

Comments

  1. श्रुती, लेख वाचल्यावर शेवटचा परिच्छेद वाचल्यावर अंगावर शहारे आले, निर्गुण भक्ती समजो किंवा न समजो, उमजो किंवा न उमजो परंतु ते शब्द ऐकल्यावर अर्थ जाणून घेण्यासाठी मन व बुद्धीची जी उत्कटता असते, ती छान टिपली आहेस. अभिनंदन ~~ कल्याणी ♥️😇

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Kalyani, those words,that sound, that environment all combining gives an effect that is memorable...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान