न वाचलेले पुस्तक...
तीन-चार आठवड्यांपूर्वी, लायब्ररीत शिरल्या शिरल्या समोर डिस्प्लेमध्ये एक पुस्तक दिसले. लांबून नाव, लेखक काहीच दिसले नाही पण कव्हर लक्ष वेधणारे होते. कुठेतरी पाहिल्यासारखेही वाटत होते. दोन-चार सेकंदांमध्ये, चार पावलांवर गेल्यावर नाव दिसले आणि " अ रे हे पुस्तक होय!" असे भारी वाले फिलिंग आले. पुस्तकाचे नाव वाचले आणि बरेच काही क्लिक झाले. लेखक, त्याची आधीची पुस्तके, हे नवे येणार याची बरीचशी झालेली जाहिरात. कोणीतरी वाचून त्याचा टाकलेला रिव्ह्यू आणि तो मी अर्धवट वाचून सोडल्याचेही आठवले. लायब्ररी मधील इतर कामे करताना डोक्यातून हे पुस्तक काही जात नव्हते पण उचलून हातातही घेतले गेले नाही. कामे संपली. मी तशीच बाहेर पडले. पुस्तक तिथेच राहिले. नंतर एक- दोन वेळा ते डिस्प्लेवर दिसलेही पण आता त्याकडे दुर्लक्ष होत होते. बहुतेक मुद्दामच. हातात घ्यावे, चाळावे,घरी न्यावे,वाचावे असे सगळे वाटत होते पण तरीही टाळलेच गेले. काल पुन्हा लायब्ररीत गेले तर डिस्प्लेला दुसरेच काहीतरी. रंगीबेरंगी शिवणकाम का विणकाम असे लावलेले. उगीचच मनखटू झाले. समोर होते तेव्हा घेतले नव्ह...