स्पर्श
थंडीच्या दिवसात गुरफटून बसावे वाटतानाच, सकाळी सकाळी ऊनही खुणावते. आणि एकदा का उन्हात गेले की मग तिथेच बसावे वाटायला लागते. असेच दोन-तीन दिवसापूर्वी ऊन पडले. उन्हात बसायला कारण म्हणून घरातल्या, दारातल्या कुंड्यांच्या आजूबाजूला रिकामे उद्योग काढले गेले. पहिलीच कुंडी उचलली. तिच्या बाहेरची शोभेची कुंडी आणि झाडाची कुंडी यांच्या मधल्या फटीतून पालीचे छोटेसे पिल्लू सुरकन बाहेर आले. काय करावे ते न कळल्यासारखे पुन्हा आत गायब झाले. आता कुंडी खाली ठेवता येईना, ते चिरडले गेले तर! पण उचलून बाहेर काढू आणि अंगावर आले तर! शेवटी मनाचा हिय्या करून छोटी कुंडी उचलली आणि अपेक्षित असल्यासारखे ते हातावर आले. ओरडून उपयोग नसल्याने मनातच किंचाळून हात झटकला. पिलू पळाले. त्याचा आकार तो कितीसा , माझा तो केवढा …माझ्या हातात जड कुंडी, बाहेरचा उजेड, सूर्यप्रकाश, त्याला भीती वाटणारे अनेक फॅक्टर पण घाबरले होते मी. घाबरण्यापेक्षा तो स्पर्श नकोसा होता. काहीतरी किळसवाणे, शिसारी वाटणारे होते त्यात. कुंडी जागेवर ठेवली. उनबीन विसरून घरात जाऊन हात धुतले. पुन्हा हात धुतले. पुन...