पिंपळपान.

थंडीच्या शनिवार संध्याकाळी,चार मित्रमंडळी जमून गप्पाटप्पा चालू असताना त्यातला एक गाणारा रादर चांगले गाणारा;अरुण दात्यांचे “या जन्मावर ,या जगण्यावर” म्हणतो.

 ते सूर, ते संगीत  आणि थंडीत गुरफटून बसलेले चार सहा आपलेपणाने ऐकणारे श्रोते. वातावरणाचा  परिणाम म्हणा की शब्द सुरांचा. का गोड गळ्याचा? पण प्रत्येक  शब्दावर हरवून जाणे एवढेच काम उरले होते . अचानक “इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे”  ही ओळ आली आणि काही केल्या डोळ्यापुढून ते जाळीदार पान जाईना.


आपले विश्व आपल्याच परिघापूरते. त्यामुळे की काय पण त्या पानावरच्या प्रत्येक रेषेत प्रत्येक जाळीत मला माझेच भोवताल दिसायला लागले. नशिबाने एवढा समृद्ध भोवताल दिला. या विचारात हरवलेले भान, जवळच्या सगळ्या जीव ओवाळून टाकावा असे क्षण देणाऱ्यांची आठवण करून द्यायला लागले. हे सगळे गाणारे, वाजवणारे, रंगवणारे,नाचणारे आजूबाजूला असणे किती भारी असते; याची जाणीव व्हायला लागली. ते गातात, वाजवतात, नाचतात, चित्रे काढतात त्यांच्या समाधानासाठी. त्यांच्यातले त्यांचे मी पण त्यांना ते करायला लावते.  पण फायदा होतो माझ्यासारख्या बाजूला वावरणाऱ्याचा.

 या लोकांचा आनंद मला त्यांच्याहीपेक्षा आनंदी करून टाकतो आणि तेही कोणतेही कष्ट न करता. केलेले काम एकच , अशा सगळ्यांच्या आजूबाजूला योग्य वेळी असणे.

कुठून येतात हे असे सगळे कलाकार आपल्या आयुष्यात? याची तर कल्पना नाही ,पण का येतात याचे उत्तर ते पिंपळ पान देऊन गेले. या सगळ्यांमुळे तर रोज जगता येते. 

त्या पिंपळपानाच्या जाळीत काही फक्त या कलाच नव्हत्या आणि नसतातही. जगणे तितके मर्यादित कुठे असते? मायेने चार घास करून खाऊ घालणारे,  नाव दिसताक्षणी कितीही कामात असले तरी फोन उचलणारे, हजारो मैलांचा प्रवास करून भेटायला येणारे,  बोललेले-सांगितलेले तर कळणारेच पण न सांगितलेली ही समजणारे, हक्काने रागावणारे ,भांडणारे आणि प्रसंगी कान उपटणारे असे सगळे तेवढ्या पानाच्या जाळीत दाटी-वाटीने राहतात . आणि तेही फक्त माझ्यासाठी माझे इवलेसेविश्व तरुन जाण्यासाठी.


हा विचारच गाण्यातून,शब्दातून ,भानावर आणायला पुरेसा होता.  भोवतालातल्या प्रत्येकाच्या असण्याने सुखावणारा होता. गाणे संपले, संध्याकाळ संपली पण माझ्या मनाला मात्र एक जाळीदार पिंपळपान देऊन गेली.

-श्रुतकिर्ती

१/०६/२०२४



Comments

Popular posts from this blog

विसर्जन

थांबा जरा !

नांव ठेवतांना