स्पर्श
थंडीच्या दिवसात गुरफटून बसावे वाटतानाच, सकाळी सकाळी ऊनही खुणावते. आणि एकदा का उन्हात गेले की मग तिथेच बसावे वाटायला लागते. असेच दोन-तीन दिवसापूर्वी ऊन पडले. उन्हात बसायला कारण म्हणून घरातल्या, दारातल्या कुंड्यांच्या आजूबाजूला रिकामे उद्योग काढले गेले. पहिलीच कुंडी उचलली. तिच्या बाहेरची शोभेची कुंडी आणि झाडाची कुंडी यांच्या मधल्या फटीतून पालीचे छोटेसे पिल्लू सुरकन बाहेर आले. काय करावे ते न कळल्यासारखे पुन्हा आत गायब झाले. आता कुंडी खाली ठेवता येईना, ते चिरडले गेले तर! पण उचलून बाहेर काढू आणि अंगावर आले तर!
शेवटी मनाचा हिय्या करून छोटी कुंडी उचलली आणि अपेक्षित असल्यासारखे ते हातावर आले. ओरडून उपयोग नसल्याने मनातच किंचाळून हात झटकला. पिलू पळाले. त्याचा आकार तो कितीसा , माझा तो केवढा …माझ्या हातात जड कुंडी, बाहेरचा उजेड, सूर्यप्रकाश, त्याला भीती वाटणारे अनेक फॅक्टर पण घाबरले होते मी.
घाबरण्यापेक्षा तो स्पर्श नकोसा होता. काहीतरी किळसवाणे, शिसारी वाटणारे होते त्यात. कुंडी जागेवर ठेवली. उनबीन विसरून घरात जाऊन हात धुतले. पुन्हा हात धुतले. पुन्हा पुन्हा हात धुतले. एक क्षणभर पण नाही मिली सेकंद झालेला स्पर्श पण कोणतेही काम सुचू देईना मला. चमच्यानेच खाण्याचे पदार्थ खाल्ले. डेटॉलने हात पण धुतले. मन काही त्या पिला पासून, स्पर्शापासून दूर जाईना. हातापेक्षा मनाला चिकटला होता तो स्पर्श.
दिवस संपला. दुसऱ्या दिवशी दोन मैत्रिणींबरोबर गवतात खुर्ची टाकून आरामात चहा पीत होते आणि एकीच्या बाहीवर छोटासा कोळी दिसला. तो झटकणार एवढ्यात ती म्हणाली चांगला असतो कोळी अंगावर बसलेला. पैसे मिळतात. आता अवाक व्हायची पाळी माझी होती. तो चावू शकतो, विषारी असतो हे सगळे माहीत असूनही थंड पणाने हा स्पर्श चांगला असतो असे म्हणत तिने तो कोळी झटकला. हातात घेऊन ती नक्कीच बसली नव्हती त्याला, पण तिच्या मनाला तो स्पर्श चावला नव्हता.
सरपटणारे प्राणी, त्यातही चावणारे- विषारी नकोच वाटतात. पण माझी आणि मैत्रिणीची रिएक्शन वेगवेगळी होती. माझी ऑलमोस्ट लेडी मॅकबेथ झाली होती हात धुवून धुवून आणि तिने शांतपणे चहा संपवला होता.
स्पर्श वाईटच होता तो. नकोसा वाटणारा. पण मनाला लावून घेतला तरच त्रास देणारा. पुढच्या वेळी मनाला काय लावून घ्यायचे आणि काय लवकर सोडायचे याचा चांगलाच धडा शिकवणारा.
श्रुतकिर्ती
१६/०६/२०२४
Thank you Shruti. लाभदायक स्पर्श 👌💟
ReplyDelete💕🙏
Delete