विसर्जन

सालाबाद प्रमाणे गौरी गणपती आले. आनंद वाटून परत निघाले. विसर्जनाचे दुःख कायमच असते, ते यावेळी जरा जास्तच वाटले. कारण होते गौरींचे नवे मुखवटे. 22 -23 वर्षानंतर गौरीचे नवे मुखवटे यंदा आणले. आणायचे ठरवल्यापासूनच नवे कसे आणायचे आणि त्याहीपेक्षा कसे नकोत याच्या चर्चांना उत आला. घरातल्या प्रत्येकाच्या मनातल्या आणि डोळे मिटल्यावर डोळ्यापुढे दिसणाऱ्या आमच्या महालक्ष्म्या बदलून आता नवे रूप डोळ्यात साठवायचे होते. तो विचार मनाला जडच जात होता. पुण्याच्या बाजारपेठा जून पासूनच विविध मुखवट्यांनी फुलून गेल्या, हे इथे बसून व्हिडिओ पाहून कळत होतेच. त्यांच्यातही विविध फॅशन ट्रेंड आहेत हेही जाणवले होते. इतक्या वर्षात घाट, वळण, मटेरियल बदलणार हे कळत होते पण वळत नव्हते. सगळेच मुखवटे एकाहून एक सरस. आपल्या गौरी म्हणून घरी कोणाला आणणार? आणायला जाणार्याचा कस लागणार होता. ढोबळ मानाने रंग, डोळे, केसाची ठेवण, दागिने घातलेले, का न घातलेले?कुंकू गोल का चंद्रकोर? असे सगळे ठरवले गेले. पण एवढ्या सगळ्या चेहऱ्यात आपले आधीचे मुखवटेच शोधणे सारखे चालू होते. दुकानातून फोटो, व्हिडिओ कॉ...