गणपती आले
गणपती आले की, मूर्ति हा सगळ्यांच्याच सगळ्यात आवडीचा मुद्दा असतो. रंग, रूप ,आकार ,प्रकार, प्रचंड विविधता आणि मग चॉईस ला खूप वाव. प्रत्येकाची आवड वेगवेगळी साहजिकच त्यामुळे मिळणारे प्रकारही विविध. नाचणारा, कोणत्यातरी असुराचा वध करणारा, शंकर-पार्वती बरोबरचा, मोरपीस वाला कितीतरी. विविध वाद्ये वाजविणार्या, लिहणार्या, वाचणार्या मूर्ती पाहून तर नजर हटत नाही.
लहानपणापासून, बाबांबरोबर मूर्ती बुक करायला जातानां आपल्या घरची मूर्ती सुखासनातील, आशीर्वाद देणारी, चारही हात सुट्टे असणारीच असणार हे माहीत असले तरी या वेगवेगळ्या मूर्ती बघायचा उत्साह काही कमी व्हायचा नाही. त्यातल्या त्यात बदल म्हणजे कद कोणत्या रंगाचा आणि शेला कोणत्या रंगाचा. सोंडेवरची नक्षी दगडूशेठ गणपती सारखी का वेगळी? हे छोटे बदल देखील, वेगळीच आहे या वेळची मूर्ती असे जाहीर करायला बळ द्यायचे.
पार्थिव मूर्ती त्या दुकानात हारीने मांडल्या की वेगळ्या दिसतात. घरी आल्या की वेगळ्याच भसतात. प्रतिष्ठापना केली की देव बनतात आणि पुनरागमनायच् च्या अक्षता पडल्या कि उदास करतात. मग येतो विसर्जनाचा नकोसा भाग आणि उरते ते डोळ्यात साठवलेले गणरायाचे रूप.
विसर्जनाची गर्दी, प्रदूषण, नकोसे वाटणारे नंतरचे दृश्य या सगळ्यातून कालांतराने शाडूच्या मूर्तीची जागा धातूच्या मूर्तीने घेतली. आता दरवर्षीची सिलेक्शन, चॉईस, कशी मूर्ती घेतलीत? हा संवाद ही प्रोसेसच नाहीशी झाली. आता गणपती कसा दिसणार हे पक्के ठाऊक होते. विसर्जनानंतरही तो घरीच असणार होता. त्यामुळे गणेशोत्सव संपल्याचे दुःख जरा मवाळ झाले. नाण्याच्या चांगल्या- वाईट बाजू हळूहळू परिचयाच्या आणि सवयीच्या झाल्या. मूर्ती तीच असली तरी दरवर्षी ती वेगळी भासते. हे वर्षानुवर्षाचे फोटो गुगलच्या कृपेने मेमरीत एकाच वेळी समोर आल्यावर कळायला लागले. बरे ती आपल्याला दिसते त्यापेक्षा समोरच्याला वेगळीच जाणवते हे तर अजून मजेशीर असते. अनंत चतुर्दशीला अक्षत टाकल्यावर चे भाव मूर्ती विसर्जनाला नेली नाही तरी थोडा काळ तसेच असतात हेही वर्षानुवर्ष तसेच घडते.
मग मनात येते, सगळ्या संतांनी सगळ्यातत्ववेत्यांनी सांगितलेली सगुण निर्गुणाची कल्पनाच वाचल्यावर एवढी जड का जाते? दरवर्षी तेच तर अनुभवतो ना या पार्थिव गणेशाच्या रूपात आपण. ‘माझा गणपती’म्हणेपर्यंत मूर्ती असणारा गणराया,’देव’ माझ्या मनातल्या हा माझा देव हे मानण्यानेच होतो हे कळलेले वळत का नाही? ‘मनातला देव जागा असेल तर दगडात देव’ हे असंख्य वेळा ऐकलेले, चार हात, उजवी की डावी सोंड, मोठे कान, मुकुट, गंध, कमळ, परशु हे शोधतच का राहतात? डोळे मिटले की ठराविकच रूप डोळ्यापुढे का येते?
असे सगळे दरवर्षी मनात येते. पण श्रावण सुरू होतो, सगळीकडे विविध रूपातील श्रीगणराय दिसायला लागतात. मग माझ्याही मनात माझा माझा, वर्षानुवर्ष वर्णन ऐकत साकार झालेला गणराया आकार घ्यायला लागतो. आणि गंमत म्हणजे गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना झाली की समोर बघितल्यावर मूर्ती कोणतीही, कशीही असली तरी मनातला आणि समोरचा कायम अगदी एकसारखाच असतो.
- श्रुतकिर्ती
- ०६/०९/२०२४
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
सार्थ श्री ज्ञानेश्वरी अ.१
Comments
Post a Comment