बांध
पूर येऊन गेला आणि हा डॅम इतका भरला आणि तो तितका . आता पाणी सोडले पाहिजे . सोडलेले पाणी किती प्रदेश बुडवणार ? किती वेगात येणार ? हीच चर्चा . लिटरचा , फार तर मिलिलिटरचा हिशोब समजणारे आपण , ते क्यूसेक्स आणि घनमीटर वगैरे ऐकायला मिळत होते . पाणीच ते , बांधून ठेवल्याने अस्वस्थ झालेले . अति झाले आणि सगळे बांध तुटून पहिल्या मिळालेल्या संधीला धावत सुटले . महत्वाच्या दिवशी सकाळपासूनच उशीर झाल्यावर पळत सुटायला लागते तसे . पाण्याला पक्के ठाऊक असते कुठे जायचे ते . तशी एरवी त्याची गतीही ठरलेलीच असते . त्याला ज्या नदीत जाऊन मिसळायचे असते तिचा धर्मच असतो वाहणे . त्यामुळे तिच्यात मिसळायचे तर यालाही थांबून चालतच नाही . नदीत मिसळले की त्याची गती नदीचीच बनते . कधी सुळकन धावणारी , मग भरभर पुढे निघून जात मागचा काठ कोरडा ठेवणारी . किंवा शांत , विस्तीर्ण वाहतच राहणारी . कधीही खंड न पडणारी . ऐलतीर पैलतीर असणारी . तळाच्या दगडांना कधीच सूर्यप्रकाशात उघडे न पाडणारी . पाणी ज्या नदीत मिसळते त्याच गतीने ते पुढे जात राहते . योग्य कामासाठी , गरज म्हणून योग...