रंग


 फोनवर बोलता बोलता मैत्रीण पटकन, अगं भिंतीच्या रंगाला मॅचिंग नॅपकिन घेतले.” असे म्हणाली आणि आम्ही दोघीही खूप हसलो. एखाद्या रंगाचे वेड लागले की असेच होते, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, तो रंग सापडायला लागतो आणि सगळीकडे तो हवाही असतो.

 तसेही  आपण रंगमय विश्वात वस्ती करून असतो. प्रकाशकिरणांचे विश्लेषण झाले की इंद्रधनुष्याचे सात रंग आपल्याला मिळतात, पण थोडेसे शास्त्रीय स्पष्टीकरण बाजूला ठेवले तर रंग ही प्रकाशा विषयीची संवेदनाच ना. अगदी ज्याला आपण पांढरा प्रकाश म्हणतो त्यातही विविध रंगाचे कण सामावलेले असतातच. पांढरा हा प्रकाशाचा पूर्ण प्रभाव, तर काळा म्हणजे अभाव. तरीही आपल्या सोयीसाठी तेही रंगच आणि या दोघांच्या मध्ये असते ती आपली रंगीबेरंगी दुनिया. असंख्य रंग, त्यांच्या असंख्य छटा. आपल्या डोळ्याला दिसतात तशाच दुसऱ्याच्या ही दिसतात, असे समजून त्यांना दिलेली काही कॉमन; काही अगदीच विचित्र नावं.

 तानापिहिनिपाजा पाठ करताना लहानपणी पडलेले, पारवा या रंगाचे कोडे: मोठे झाल्यावर रामा कलरची पैठणी किंवा राणी कलरचा शालू अशा कोड्यामध्ये अजून अजून अडकत गेले. बोलणार्‍याला आणि ऐकणाऱ्याला एकच रंग कळला आहे का? हे ही मनात येते इतके मजेशीर संभाषण होते हे रंग सांगतांना.

 बरं आहेत रंग म्हणून त्यांना नुसते सोडूनही देत नाही आपण. मनाचे आवडतीचा- नावडतीचा, शोभणारा, खुलणारा, बटबटीत असे अनेक रकाने काढून; रंगांनी ते भरून टाकतो. रंग म्हणजे चैतन्यच म्हणून तर भावनांना, स्वभावाला, वागण्या-बोलण्याला रंगानेच डोळ्यापुढे उभे करतो ना. कथकलीतला रावण काळ्या रंगाचे कपडे घालतो कायम. तर राम कृष्ण हिरवे. रंग डोळ्यापुढे आला की मनाला संवेदना जाणवताच. कोणत्यातरी, चांगल्या-वाईट, हव्याहव्याशा, नको नकोशा आणि मन झटकन रिएक्शनही देते त्यावर. मला नाही बाई/ बुवा हा रंग आवडत म्हणताना, अगदी आतून काही तरी नकोसे, झटकून टाकावेसे वाटतेच की. कोणतीही वस्तू, घटना, मनुष्य काहीही आठवायचे म्हटले तर ते फार क्वचित ब्लॅक अँड व्हाईट असते. आठवण राहण्यात रंगाचा वाटा मोठाच्या मोठा. आंबा निळा येत नाही कधी डोळ्यापुढे. ना कधी कावळा पिवळा. विठुरायाचे नाव काढताच तो सावळाच दिसावा लागतो डोळ्यापुढे. सगुण रूपा साठी रंगरूपाची आवश्यकता भासतेच आणि म्हणूनच तर त्याच्या सावळ्या रंगात मिसळून जाण्यासाठी गोकुळात रंग खेळला जायला लागला आणि रंगांना स्वतःचा असा सणही मिळाला.

मिसळून जायचे म्हणजे अस्तित्वच पुसून टाकायचे हे रंग शिकवतात, पण तेवढ्यावर न थांबता नवा रंग ही धारण करायचा हेही ते सांगतात. हे सोयीस्कर रित्या विसरायला होते आपल्याला. मॅचींग शोधता-शोधता अक्खे दुकानच काय अख्खी बाजारपेठ पालथी घातली जाते बऱ्याचदा, पण या रंगीबेरंगी दुनियेत एक रंग दुसऱ्या सारखा नाही हेच खरे!

-श्रुतकिर्ती

११/०३/२०२२



 

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

सुरेश भट

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान