मिसळणाचा डबा

 

 पावसात घरात अडकून पडलं की, टीव्ही बघणे हा एकमेव सामुदायिक कार्यक्रम सुरू होतो. काल असेच SBS Food वर एक कार्यक्रम नजरेसमोर आला. कोणता तरी केक आणि काहीतरी तिखटमिठाचे शिकवणे चालू होते. मी आपली डोक्यात काहीही नोंद न घेता, डोळ्यांनी बघत होते. शेवटी कळले या सगळ्यात ते काही मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणार होते, त्याबद्दलच माहिती सांगत होते. मेंदूने तेही रजिस्टर केलेच नाही. संपतांना शेफने बरोबरच्या गेस्टला त्याच्या, spice rack मध्ये असणाऱ्या आणि वारंवार संपणाऱ्या पाच मसाल्याच्या पदार्थांची नावे विचारली आणि मेंदू, कान टवकारले गेले. त्याच्या मीठ, मिरपुडीच्या बाटल्यांच्या जागी, मला माझा मिसळणाचा डबा दिसायला लागला. मनच ते, खेळ म्हणून मी स्वतःलाच विचारले माझे कोणते ते पाच मसाल्याचे पदार्थ?

 आता मात्र गोंधळ उडाला. ही संख्या चुकीची वाटायला लागली. मसाल्याचे पाळेच तर सात खाण्याचे. त्यातले सगळेच रोज लागणारे. त्याबरोबरच फोडणीला लागणार म्हणून शेजारी ठेवलेली हिंगाची डबी आली, बरं डब्यात जिरे असले तरी जिरेपूड वेगळी. काळा गोडा मसाला शेजारीच निघाला. हुश्श म्हणताच, खड्या मसाल्यांच्या बरण्या, डबे डोक्यात फिरू लागले. बरं लवंग, वेलदोडे, जायफळ वेगळ्या कपाटात असले तरी वगळून कसे चालणार होते. आता संपले असे वाटत असताना, डोळ्यापुढे आली असंख्य रेडीमेड पाकिटे. तीही संपतातच की पटापटा, आणि सणावारी, क्वचित प्रसंगी लागणारे केशर होतेच राहिलेले यादीत. मग मी कशी सांगणार होते पाच पदार्थ?

 दगड फुल का पत्थरफुल, जायपत्री का दालचिनी, नाकेसर का कबाबचीनी, या घोळात पाचाचे पन्नास कधी झाले ते डोक्याला समजलेच नाही. यादी मनात आल्यावर वाटले, किती तो सोस. काहीना काही घालून पदार्थाला चव आणण्याचा. कधी कधी अती घालून  मुळचविला मारून टाकण्याचा. पण मग वाटले, मसाल्याशिवाय पदार्थाला मजा नाही, हेही खरेच. साधे तिखट घेतले तरी घरात चार प्रकार सापडतील. एक रंगा साठी तर एक चवीसाठी.

 उपलब्धता वाढली, हौस वाढली, क्रयशक्ती वाढली, तसेच जगभरातले पदार्थ करण्याची आणि खाण्याची इच्छाही वाढली. त्यामुळे आणखी काही काही मसाल्याच्या पदार्थांची त्यात भरच पडली. जिऱ्याच्या शेजारी thymeपण सुखाने नांदायला लागली. आल्याबरोबर गलांगल  फ्रिजमध्ये पटकन घुसले, आणि अंगणात पुदिन्याबरोबरच रोजमेरीची ही कुंडी आली. जगण्यासाठी खायचे हा विचार केला तर हे सगळे व्यर्थ फोल वाटते. पण रोज जगायला लागणारच, ते कंटाळवाणे न व्हायला हे सगळे ही लागतेच लागते. बिन मसाल्याचा पदार्थ चांगला होत नाही असे मुळीच नाही. उलट ज्यात त्यात बचाबचा कांदा, लसूण ,मसाला घालून सगळे पदार्थ एकसुरी करणे हे तर त्रासदायकच. विचार केला तर विचारांना पण मसाला हवाच, नाहीतर त्यातही मजा काय?

 थोडक्यात काय तर माझ्या उजव्या हाताला कोणते पाच मसाल्याचे पदार्थ असतात याचे उत्तर, पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हावी, इतके मोठे निघाले. साता समुद्रा पलीकडे जाऊन मसाल्याच्या पदार्थांसाठी युद्ध करणाऱ्या खलाशांइतका त्रास न होता हे सगळे मला मिळतात, माझ्या मिसळणाच्या डब्यात गुण्यागोविंदाने नांदतात. मनात येईल तेव्हा, जिभेचे चोचले पुरवायला हाताशी असतात. याहून अधिक सुख ते काय असते? मारुतीच्या शेपटासारख्या वाढणाऱ्या यादीतल्या, प्रत्येक मसाल्याची वापरतानाची चिमूट वेगळी आहे. प्रमाण बिघडले की चव बिघडते हमखास. मनाच्या मिसळणाच्या डब्यातही खूप काही आहे, चिमटीचे प्रमाण तेवढे साधायला हवे.

-श्रुतकिर्ती

०४/०३/२०२२



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान