बांध

 

पूर येऊन गेला आणि हा डॅम इतका भरला आणि तो तितका. आता पाणी सोडले पाहिजे. सोडलेले पाणी किती प्रदेश बुडवणार? किती वेगात येणार? हीच चर्चा. लिटरचा, फार तर मिलिलिटरचा हिशोब समजणारे आपण, ते क्यूसेक्स आणि घनमीटर वगैरे ऐकायला मिळत होते.

 पाणीच ते, बांधून ठेवल्याने अस्वस्थ झालेले. अति झाले आणि सगळे बांध तुटून पहिल्या मिळालेल्या संधीला धावत सुटले. महत्वाच्या दिवशी सकाळपासूनच उशीर झाल्यावर पळत सुटायला लागते तसे.

 पाण्याला पक्के ठाऊक असते कुठे जायचे ते. तशी एरवी त्याची गतीही ठरलेलीच असते. त्याला ज्या नदीत जाऊन मिसळायचे असते तिचा धर्मच असतो वाहणे. त्यामुळे तिच्यात मिसळायचे तर यालाही थांबून चालतच नाही. नदीत मिसळले की त्याची गती नदीचीच बनते. कधी सुळकन धावणारी, मग भरभर पुढे निघून जात मागचा काठ कोरडा ठेवणारी. किंवा शांत, विस्तीर्ण वाहतच राहणारी. कधीही खंड न पडणारी. ऐलतीर पैलतीर असणारी.  तळाच्या दगडांना कधीच सूर्यप्रकाशात उघडे न पाडणारी. पाणी ज्या नदीत मिसळते त्याच गतीने ते पुढे जात राहते.

 योग्य कामासाठी, गरज म्हणून योग्य ठिकाणी बंधारा लागतो. नदी थांबते पाणीही त्याची गती बदलते. कितीही उपयोग असला तरी तो बांधच, थांबले की पाणी साठत जाते. नदी वाहत असते, पाणी साठत राहते. छोटी नदी अचानक मोठी होते. पार फुगते, पण बंधाऱ्याचे काय? तो कसा वाढणार? बंधारा बांधणाऱ्याने त्याला दरवाजे केलेले असतात. ठराविक साठ्यानंतर ते उघडायचे असतात. किलकिले करून थांबलेल्या साठ्याला वाट करून द्यायची असते. प्रत्येक बंधाऱ्याचे, नदीचे, प्रदेशाचे गणित असते. कधीतरी जोराचा पाऊस येतो गणित चुकते. पाणी जास्त गतीने साठत जाते. किलकिला करावा लागणारा दरवाजा पूर्ण उघडला जातो. कधी तर तो उघडायच्या आधीच कोलमडून पडतो. सुसाट वेगाने पाणी पळत सुटते. थांबून ठेवल्याने वाया गेलेला वेळच जणू भरून काढायचे असल्यासारखे, भराभरा निघते. रस्त्यात येणाऱ्याचे भान न उरल्या सारखे. नदीत असताना निर्मळ असणारे, वेगाने, गतीने, थांबल्याने, गढूळ होऊन जाते.

 मनाचे, मेंदूचे, भावनांचे, विचारांचे, थोडक्यात आपले स्वतःचेच हेच होते ना. बांध हवाच पण कोलमडून जायच्या आधी, दरवाजा किलकिला करून प्रवाहीत राहण्याचा गुणधर्मही जपायला हवाच की. नदी पुढे जाते, शांत होते. निर्मळ होते. तिचे काळ काम वेगाचे गणित पुन्हा मांडते, तिला कुठे पोचायचे हे पक्के ठाऊक असते मग बांध कितीही लागोत मधे.

-श्रुतकिर्ती

१८/०३/२०२२


Rivers know this: there is no hurry. We shall get there some day.

A.A.Mine ( Winnie the Pooh)

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान