पोर्ट की
थंडीने हळूहळू काढता पाय घ्यायला सुरुवात केलीय आणि उबदार ऊन जाणवायला लागलेय. हे भल्या पहाटे दुलईत गुरफटणाऱ्या आपल्यापेक्षा झाडापानांना आधी कळते. थंडीने मरगळलेले करडे , राखाडी झालेले त्यांचे जग , पोपटी-हिरवे होता होताच सगळीकडे फुलांचे बहर दिसायला लागलेही. काही काही फुलांचे वास आधी जाणवतात तर काही माझ्याकडे न पाहता पुढेच कसे जाल ? हे सांगायला पानोपानी फुलून अस्तित्व दाखवून देतात. या सगळ्यातून स्प्रिंग आलाय , उन्हाळा आता दूर नाही हे कळलेले असतेच. माझ्या रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर , भले थोरले चार माणसांना मिळूनही कवेत न घेता येण्यासारखे अनेक हिरवेगार वृक्ष आहेत. तिथून जाताना काल अचानक वार्याच्या झुळुकीबरोबर एक मंद सुवास आला. आणि मान वर करायचे कष्टही न घेता त्या चार-पाच झाडातले आंब्याचे झाड कोणते हे कळले होते. ते पानोपानी मोहरले होते. उन्हाळा आला , कैर्या , पन्हे , लोणचे , रस आम्रखंड आंबा बर्फी , आईस्क्रीम , मस्तानी… क्षणार्धात तीनशेसाठ डिग्री चा प्रवास जिभेने केला. पुढची पाच सात मिनिटे , आंबा या एका शब्दाने जुन्या नव्या आठवणींच्या जगात भिरीभिरी फिरवून आणले. किती...