गणपती आला न्…

 

नव्या वर्षाच्या नव्या कॅलेंडर मध्ये, भराभरा पाने उलटत गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीची तारीख बघायचीच असते. जोडून सुट्टी आली आहे कां? दहा दिवसांचा का अकरा दिवसांचा गणपती आहे हे बघताना, गणपतीचे वेध लागलेले असतात.

 यावर्षीही असंच झालं आणि यथावकाश वाजत गाजत गणपती आले. ‘पहिले नमन ‘ म्हणत ज्याच्यामुळे सगळ्याची सुरुवात होते त्याच्या पूजेची, सजावटीची, प्रसादाची तयारीही उत्साहात चालूच होती . आजूबाजूचे वातावरणही अगदी नेहमीसारखेच गणपतीमय झाले होते. उत्साहात,  धामधुमीत सुरू झालेला हा सोहळा एक दिवसाचा, दीड दिवसाचा, पाच दिवसाचा असे करत करत अनंतचतुर्दशीला येऊन पोहोचला.

आला आला म्हणताना, गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला.  मागची आवरावरी करताना डोळ्यापुढे मनात बरंच काही येत राहीले.

 यावर्षी डेकोरेशन काय करायचे याच्या डायनिंग टेबलवर घडणाऱ्या चर्चा.  रंगसंगती, नक्षी यावरचे लुटुपुटूचे वाद, त्यानंतर रोजची कामे आटोपल्यावरची छोटी छोटी तयारी.  खरेदी, आवराआवरी आमंत्रणे, एक ना दोन. एक सण साजरा करण्यामागे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी. मग सगळ्याचा शेवट विसर्जन. आणि नंतर राहणाऱ्या आठवणी. आनंद, भक्ती, श्रद्धा,  विश्वास या सगळ्याच्या पलीकडेही बरंच काही देऊन जातात हे दहा दिवस. घरी आलेला,  घरचाच पण जरा दूर राहणारा जवळचा, सालाबाद प्रमाणे घरी येऊन गेला  हीच भावना जाणवत राहते. गणपती बरोबर येणाऱ्या गौरी तर देवातील माणूस आणि माणसातील देव या साखळीचे रूपच जणू. घरी आलेल्या माहेरवाशीणी का महालक्ष्म्या? कोणत्या रूपात बघावे?  मनात येईल तेव्हां, मनात जे येईल तसे. त्यांची  तयारी तर जंगीच. एकट्याने न होणारी. न सांगता,  न मागता मग दहा हात उभे राहतात. सगळे चुटकीसरशी पार पाडतात. “तुझ्या गौरीला लागणारे पडवळ बाजारात दिसले .“ हे आवर्जून सांगतात आणि सवाष्ण म्हणून जेवायला येऊन स्वतःच्या जेवणानंतर घरच्या दमलेल्या बाईला आग्रह करून जेवायला घालतात.

विसर्जनानंतरच्या धुसर डोळ्यांच्या मागे या सगळ्या आठवणी दडलेल्या असतात. आणि मनात आनंदाचे प्रतीक होऊन तो श्री गणेश आनंदाने नाचत असतो मग खरंच पटतं ‘गणपती आला आणि नाचून गेला.’

- श्रुतकिर्ती

-०९/०९/२०२२



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान