धडपडणे…


कपाट उघडून कप्प्यातून काहीतरी काढले आणि डोके वर केले मात्र, ठण्ण्… वरच्या कपाटाचे दार उघडेच ठेवले होते. चांगलेच डोके आपटले.

विचार केला तर गेल्या आठवड्यात दोन-तीनदा डोकेच आपट,  ठेचच लाग असं झालेले होतेच आणि जाणवले आपण बर्याचदा धडपडतोय.

 वरचे कपाट उघडले आहे माहीत असूनही डोके वर केलेच कसे जाते?  हे कोडे काही सुटेना.  रोज ज्या  दारातून शंभर वेळा जातो त्याच्यात पाय अडखळतोच कसा? दाराला हँडल असताना वेगळीकडेच धरून हात चेमटतोच कसा? बरंही आपटापटी होवून भागत नाही. मग सुरू होते कसे झाले? काय झाले? ची कथा. जखम टेंगूळ  दिसणारे असले  की मग तर विचारू नका. भेटणारा प्रत्येक जण विचारणारच आणि मग त्यावर, “हळूच काम करत जा”, “ लक्ष कुठे असते?” “एकावेळी एकच गोष्ट करावी” असे समोरच्याच्या नात्यावर आणि स्वभावावर अवलंबून असलेले रिप्लाय वजा सल्ले, अर्थात चांगलेच पण येतात मात्र खरे. कुठून आपटलो असे वाटयला लावतातही ते. त्यातच एखादा वयाने आणि अधिकाराने मोठा आवाज “वेंधळेपणा नको करत जाऊ” म्हणतो मात्र…

आणि डोक्यात चक्र फिरायला लागते नक्की काय होते?  माहित तर असतेच की दार, ड्रॉवर, भिंत कुठे आहे ते. आपणच तर ते आधी उघडलेले, पाहीलेले असते.  मेंदूला माहीतही असते हे कपाट उघडायचे.  आत हे हे ठेवायचे किंवा काढायचे.  आणि ते बंद करायचे. त्याचा अल्गोरिदम पक्का असतो मग मध्येच हे धडपडणे येते कुठून.  हा मेंदू सगळ्या स्टेप्स करत असतो. एखादी स्टेप झाल्यावर ते मनच  कुठेतरी फिरायला जाते. त्याला दुसरेच काहीतरी आठवते. नवीन काहीतरी लक्ष वेधते. किंवा पाहिजे ती वस्तू घेतल्यावर त्याचे काय करायचे यात ते बुडून जाते आणि इथे तो बिचारा मेंदू शेवटची स्टेप विसरूनच जातो. मन पार उडी मारून पुढे निघून जाते.  जो हात ते कपाट उघडतो, जे फिजिकल डोके त्या ड्रॉवरच्या आत वाकलेले असते ते मात्र तिथेच राहते की!

मग काय ?  Ooh, aah, ouch…टेंगळे, जखमा सगळे काही. तर  काय अशा माणसाला वेंधळे म्हणायचे? मुळीच नाही. त्याचा मेंदू, त्याचे मन त्याच्या शरीरापेक्षा सुपरफास्ट धावते एवढेच खरे.

हे पटले की सगळे सोपे झाले. आता काय माहिती झाले आहे हा प्रॉब्लेम माझा नाहीच. मेंदूच्या, मनाच्या फास्ट स्पीडचा आहे. त्याला ऑलिंपिक स्प्रिंट मारायची आहे, यात त्या हातापायांचा काय दोष? मग आता करायचे? काहीच  नाही. बँडेड,  बँडेज, क्रीम, बाम तयार ठेवायचा आणि सरळ रोजच्या कामाला लागायचे.  दारं उघडायची, कपाटे बंद- उघड करायची, ड्रॉवरही उधडायचेच आणि अधून मधून धडपडतही  राहायचे कारण मेंदूच्या, मनाच्या सुसाट धावण्याने, मोकाट सुटण्याने, कशाततरी हरवून जाण्याने तर रोजच्या जगण्याची मजा आहे.

# गिरे तो भी टांग उपर

-श्रुतकिर्ती

१७/०९/२०२२



Comments

  1. Silver lining दिसायला लागले की शांती मिळते नाही? 😌 ~ कल्याणी

    ReplyDelete
    Replies
    1. Perfect सांगितलेस😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान