पोर्ट की


थंडीने हळूहळू काढता पाय घ्यायला सुरुवात केलीय आणि उबदार ऊन जाणवायला लागलेय. हे भल्या पहाटे दुलईत गुरफटणाऱ्या आपल्यापेक्षा झाडापानांना आधी  कळते. थंडीने मरगळलेले करडे, राखाडी झालेले त्यांचे जग ,पोपटी-हिरवे होता होताच सगळीकडे फुलांचे बहर दिसायला लागलेही. काही काही फुलांचे वास आधी जाणवतात तर काही माझ्याकडे न पाहता पुढेच कसे जाल? हे सांगायला पानोपानी फुलून अस्तित्व दाखवून देतात. या सगळ्यातून स्प्रिंग आलाय, उन्हाळा आता दूर नाही हे कळलेले असतेच.

माझ्या रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर, भले थोरले चार माणसांना मिळूनही कवेत न घेता येण्यासारखे अनेक हिरवेगार वृक्ष आहेत. तिथून जाताना काल अचानक वार्याच्या झुळुकीबरोबर एक मंद सुवास आला. आणि मान वर करायचे कष्टही न घेता त्या चार-पाच झाडातले आंब्याचे झाड कोणते हे कळले होते. ते पानोपानी मोहरले होते.

उन्हाळा आला, कैर्या, पन्हे, लोणचे, रस आम्रखंड  आंबा बर्फी, आईस्क्रीम, मस्तानी… क्षणार्धात तीनशेसाठ डिग्री चा प्रवास जिभेने केला. पुढची पाच सात मिनिटे, आंबा या एका शब्दाने जुन्या नव्या आठवणींच्या जगात भिरीभिरी फिरवून आणले.

 किती ताकद होती त्या एका मंद सुवासात. माझ्या उन्हाळ्यांची, लहानपणीची,  आठवणीतल्या गोड-तुरट -आंबट माणसांची ती पोर्टकी होती.

 या मोहोराला माहीत होते मला कुठे नेऊन पोहोचवायचे ते. त्याचा टाईम ट्रॅव्हल रूट पक्का होता. हे लक्षात आले आणि मेंदूला नवा खेळ मिळाला, तसेही त्याला रोजच्या कामापेक्षा असे खेळच जास्त आवडतात.

 मग काय जिथे तिथे अशा पोर्टकी दिसायला लागल्या. कोणतीच दृश्य वस्तू, घटना,  रंग,  रस, गंध अगदी समोरची ओळखीची किंवा अनोळखी माणसे, एकटी दिसत जाणवतच नव्हती. चांगल्या वाईट संवेदना या सगळ्याशी जोडलेल्या होत्या. आठवणींच्या अफाट जाळ्यातले अनेक बिंदू एकाच वेळी किती ठिकाणी स्पर्शून जातात आणि एवढासा जेमतेम किलो दीड किलोचा मेंदू मणामणाची ओझी आयुष्यभर किती सहज पेलतो,  याचीही जाणीव झाली. जितक्या आठवणी जास्त तितक्या या किल्ल्या जास्त.  तितके हे वाटेल त्या काळांनाही एकत्र जोडणारे प्रवासही जास्त.  आठवणी जास्त असण्यासाठी पुन्हा तो मेंदूही आलाच म्हणजे हे खरंच गुंतलेले जाळे आहे. पण म्हणूनच त्या पोर्टकी ची  गरजही जास्त आहे, रोजच्या रटाळ, धकाधकीच्या गुंत्यातून एक सरळ धागा पकडत सोडवायला  आणि पुन्हा गुंत्यात अडकायच्या  आधी ताजेतवाने व्हायला.

मग करायचे काय आणि कसे?  सोप्पे आहे. जे के रोलिंग ताईंनी सांगितल्याप्रमाणे, इतर मगल्सचे लक्ष जाणार नाही अशा भरपूर पोर्टकीज् तयार करायच्या आणि तयार व्हायचे काळ वेळच्या पलीकडच्या प्रवासाला!

-श्रुतकिर्ती

२३/०९/२२




Comments

Popular posts from this blog

कंटाळा

पद्धत

अवरग्लास