दिवाळी
नेहमीप्रमाणे दिवाळी आली. छ्या… हे वाक्य लिहिताना पण विचित्र वाटते. दिवाळी नेहमीसारखी कधीच नसते. दरवर्षी ती वेगळीच असते. आठवणीत जितक्या मागे जाता येईल तेवढ्या वेळी त्या त्यावर्षीचे काहीतरी वेगळे असतेच. वर वर पाहता फराळ, फटाके,आकाशकंदील, रांगोळी, दिवाळीअंक, नवे कपडे असे परम्युटेशन असले तरी त्याचे कॉम्बिनेशन दरवेळी वेगवेगळे असते. एक फॅक्टर कॉन्स्टंट असतो. त्यात असणारी माणसे. पण तीही काळाप्रमाणे बदलतात किंवा त्यांचे रोल बदलतात. वय, जागा, परिस्थिती बदलते तसे यातल्या प्रत्येक आठवणीचे संदर्भ बदलतात. प्रत्येकाच्या आठवणीत फराळ असतोच पण त्याला जोडून येणारी चव, घरभर पसरलेला तळणीचा वास, तो करणारे हात हे वेगवेगळे. त्यामुळे मनात येणारा भावही नक्कीच वेगवेगळा. माझ्याही गेल्या अनेक दिवाळ्या चार चौघांसारख्याच. पण मागे वळून पाहिले की उरणार्या आठवणी फक्त माझ्या पुरत्याच. शाळेत असताना दादा बरोबर बांधलेला किल्ला मला जसा आठवतो तसाच त्यालाही नाही आठवणार. त्याच्या डोक्यातला किल्ला त्यात मी असूनही त्याचा त्याचा वेगळाच असणार. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी काढलेली माझी रांगोळी छानच असायची हा...