विरजण, टोस्का, इकेबाना आणि बरेच काही…

 

मातृभाषा न कळणारे रोज आजूबाजूला भरपूर असतात. छोट्या छोट्या गप्पा मारता मारता, काहीतरी तुझे माझे शेअर केले जाते. आणि इथे सगळे गडबडते. साधे साधे प्रश्न असतात पण उत्तर उगीचच अवघड होऊन जाते. काय सांगायचे यापेक्षा कसे सांगायचे यातच हरवायला होते. तिकडच्या बाजूच्यांचेही असेच होत असावे बहुतेक. ओढून ताणून,  माहीत असणाऱ्या किंवा समोरच्याला माहीत असतील असे वाटणाऱ्या शब्दांचा, चवींचा, भावनांचा, घटनांचा आधार घेत घेत संभाषणाची गाडी चालू ठेवावी लागते.  नाहीतर ‘ स्मॉल टॅाक्स’ पुरतीच मर्यादित राहते.

संध्याकाळी बागेत भेटलेल्या आजीशी बोलताना,  त्यांचे शब्द कळतात. अर्थ कळतात. कारण भाषा कळते. पण त्या एखाद्या वस्तूचे, घटनेचे वर्णन करत असतानांचे चमकलेले डोळे दिसले तरी कारण उमजत नाहीच.

रेडिओवर,  अखंड चाललेल्या गप्पांच्या मधली गाणी ऐकू तर येतात पण लॉंग ड्राईव्हच्या प्ले लिस्ट मध्ये ती कधी सिलेक्ट होत नाहीत.  हौस म्हणून चव बदल म्हणून जगभरचे पदार्थ ताटात हजेरी लावतात पण दमून भागून घरी आल्यावर किंवा चार दिवसांच्या आजारपणानंतर त्यांची चव लागत नाही. भाषांतर जमूनही,  लॉस्ट इन ट्रान्सलेशन का?

या प्रश्नाचे उत्तर एका शब्दातच मिळाले. प्रत्येक भाषेचे आपले अस्तित्व असते. घेतला शब्द निवडला त्याला पर्यायी शब्द असे भाषांतर होत नसते. तसे केले तर मग सांगताच येत नाही दोन चमचे विरजण कशासाठी लागते ते. हात उष्टा कधी आणि खरखटा कधी होतो तो. हे शब्द अन ट्रान्सलेटेबल असतात. एका शब्दात तो शब्द न बसणारे.

 टोस्का हा असाच रशियन शब्द. त्याचे भाषांतर करताना असे म्हणतात, की इंग्रजीतला कोणताही एक शब्द या शब्दाच्या असंख्यछटा दाखवण्यास असमर्थ आहे. एक अख्खी संस्कृती डोळ्याखालून जावी लागते. अनुभवावी, जगावी लागते, अर्थ समजायला.

 हे वाचल्यानंतर लक्षात येते शब्दाला प्रतिशब्द मिळणे अगदी सहज शक्य,  पण अर्थाला तोच अर्थ अवघड. कधी कधी दुरापास्तच. जवळपास पोचणारे शब्द सापडले तरी खूप झाले. मग काय करायचे? मनातले कसे सांगायचे? सरबरीत भाजीला जिवंत फोडणी दिली हे कसे समजावायचे? साडीचा रंग आमसुली किंवा किरमीजी आहे हे कसे सांगायचे?  करडा स्वभाव  आणि करडा रंग वेगवेगळे, सुकलेले प्रत्येक फूल निर्माल्य नसते असे असंख्य बारकावे भाषेत कसे बांधायचे?

अवघडच सारे. विचार केला की जाणवते  हे शब्दच सारे. काळे पांढरे नव्हे, मग जोडायच्या भावना त्याबरोबर संदर्भ, अनुभव,  उदाहरणे याची जोड घेत हळूच पोहोचायचे त्या शब्दांच्या पलीकडे. मग सहज समजेल ही आणि सांगता येईल ही, विरजण कसे लावायचे ते.

-श्रुतकिर्ती

-०७/१०/२०२२






दिवानो की बाते है

इनको लबपर लाये कौन?

 इतना गहरा जाये कौन?

 खुद को युं उलझाये कौन?

-  संदीप खरे

Comments

  1. हे शब्दातीत सारे, निःशब्द करणारे. 😃💕 ~ कल्याणी

    ReplyDelete
    Replies
    1. शब्दच शब्दाला निशब्द करणारे…

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान