दिवाळी

नेहमीप्रमाणे दिवाळी आली. छ्या… हे वाक्य लिहिताना पण विचित्र वाटते. दिवाळी नेहमीसारखी कधीच नसते. दरवर्षी ती वेगळीच असते.

आठवणीत जितक्या मागे जाता येईल तेवढ्या वेळी त्या त्यावर्षीचे काहीतरी वेगळे असतेच.  वर वर पाहता फराळ, फटाके,आकाशकंदील, रांगोळी, दिवाळीअंक, नवे कपडे असे परम्युटेशन असले तरी त्याचे कॉम्बिनेशन दरवेळी वेगवेगळे असते. एक फॅक्टर कॉन्स्टंट असतो. त्यात असणारी माणसे. पण तीही काळाप्रमाणे बदलतात किंवा त्यांचे रोल बदलतात. वय, जागा, परिस्थिती बदलते तसे यातल्या प्रत्येक आठवणीचे संदर्भ बदलतात.

 प्रत्येकाच्या आठवणीत फराळ असतोच पण त्याला जोडून येणारी चव, घरभर पसरलेला तळणीचा वास, तो करणारे हात हे वेगवेगळे. त्यामुळे मनात येणारा भावही नक्कीच वेगवेगळा. माझ्याही गेल्या  अनेक दिवाळ्या चार चौघांसारख्याच. पण मागे वळून पाहिले की उरणार्या आठवणी फक्त माझ्या पुरत्याच.

 शाळेत असताना दादा बरोबर बांधलेला किल्ला मला जसा आठवतो तसाच त्यालाही नाही आठवणार. त्याच्या डोक्यातला किल्ला त्यात मी असूनही त्याचा त्याचा वेगळाच असणार. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी काढलेली माझी रांगोळी छानच असायची हा माझा गैरसमज दूर व्हायला कितीतरी वर्ष गेली.  पण आजही मनातल्या मनात मी त्यावेळी छानच रांगोळी काढायचे हीच आठवण पक्की आहे. किती वेळा खाल्लेला चिवडा, पाहून, हाताखाली मदत करूनही त्या  चवीला पोहोचत नाही. ते कळते ही फक्त मलाच.  कारण आईच्या हातची चव असते फक्त माझ्याच डोक्यात. उदबत्तीने फटाके, तेही लक्ष्मी तोटे लावायची कायमची भीती, पायरीच्या टोकावर लवंगी फटाका ठेवून तो लागायच्या आधीच धूम  ठोकल्याने जात नसते. हे कळायला आधी बाबा आणि मग दादाच्या बरोबर भरपूर फटाके उडवायला लागले होते. ती भीती माझ्यासारखी तशीच्या तशी दुसऱ्या कुणाला का कळणार? कुणाला कशाने काय आठवेल तर कुणाला काय. किशोरच्या दिवाळी अंकाबरोबरच, आनंद छावा कींवा मग नंतर आलेला ट्विंकलचा दिवाळी अंक मिळाला की होणारा आनंद परत कशानेच मिळत नाही. बिघडलेला पदार्थ,  पुसली गेलेली रांगोळी , मोहरी आळिव न उगवलेला किल्ला आणि फुलबाजीने भोक पडलेला नवा ड्रेस, अशाही अनेक आठवणी असतातच की. पण आता त्या आठवून हसूच जास्त येते.

 सगळ्या आठवणी काही इतक्या भूतकाळातल्या नसतात . गेल्या दोन-तीन वर्षातल्या दिवाळ्या या काही न करता ही कायमच्या लक्षात राहणारच आहेतच. अंगणात तळलेल्या शेव चकल्यांपासून ते अगदी कालच्या रविवारच्या दिवाळी पहाट पर्यंत रोज रोज आठवणी तयार होतच राहणार.  फक्त त्यातल्या काही मेंदूच्या चाळणीतून निघून जाणार.  तेच तेच सगळे जरी दरवर्षी असले तरी दिवाळी येणारच.  ज्या गोष्टी आठवायच्या त्या आठवणारच.  त्या आठवणींमुळे तरी काही प्रथा, पद्धती, परंपरा थोड्या थोड्या बदलत का होईना पार पडणारच आणि पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या वेळी ही दिवाळी देखील आठवणारच. मग पटापट मन आणि मेंदू आजच्यासारखाच दिवाळीच्या तयारीलाही लागणारच.

शुभ दिपावली!


श्रुतकिर्ती

२१-१०-२०२२



Comments

  1. ♥️🪔 ॥ शुभ दीपावली ॥ 🪔♥️
    ~ कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान