“मी पण!”
काल मैत्रिणीने एक व्हिडिओ पाठवला. प्राण्यांच्या मनातले जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद करणाऱ्या एका ॲनिमल कम्युनिकेटर किंवा व्हिस्पररचा. छानच होता. लगेच बोलता बोलता हीलर , ॲारा रिडर असे सगळे विषय चर्चेत आले. हे सगळे खूप इंटरेस्टिंग आहे वाटायला लागल्याने आणखीन चार दोन व्हिडिओ पाहिले. AI च्या कृपेने लगेच ऑनलाईन कोर्सेस च्या जाहिराती दिसायला लागल्या आणि आपणही हे करून बघावे असे मन मांडे खायला लागले. मनातलेच मांडे पटकन तयार झाले आणि डोळ्यापुढे पार क्रिस्टल बॉल , धूर , रंगीबेरंगी स्टोन्स आणि मध्ये मी असले चित्र दिसले. तेवढ्यात , दुसऱ्या एका मैत्रिणीने रिकाम्या डब्यात चार लाडू घालून पाठवले होते ते आठवले. मैत्रिण सुगरण. मिठाया खाव्यात तर तिच्याच हातच्या. त्यामुळे पटकन लाडू तोंडात टाकला आणि आपणही डिंक आणून ठेवलाय विकेंडला लाडू करूया. तेव्हा हिलाच विचारू नक्की काय केले , हेही मेंदूने नोंदवून ठेवले. तिसऱ्या मैत्रिणीची बाग फार छान. कोणतीही काडी तिने जमिनीत रोवावी आणि रोपाने बहरून फुले फळे द्यावीत इतकी तिची हातोटी. तिची फुलेपाने पाहिली की तो विकेंड बाग खुरपण्यात आणि आहे ती चार झाडे खत -माती ...