तिसरीतली ती नवा कोरा गुलाबी फ्रॉक घालून गाण्याच्या क्लास ला चालली होती. चार घरे सोडून क्लास, तरी नव्या फ्रॉकमुळे घर पट्ट्कन आले. बेल वाजताच काकूंनी दार उघडले, 'नवा फ्रॉक वाटते!' स्वारी खूषच झाली, त्या नादात पेटीचा बॉक्स पटकन उघडला गेला, दत्ताच्या फोटोला नमस्कार करून सरांची वाट पाहणे सुरु झाले. नेहमी गप्पा मारणारे सर आज आल्याआल्या शिकवायलाच लागले.आत्ता विचारतील मग विचारतील पण नाहीच. क्लासही संपला. निघताना सरांचे "ताईचा फ्रॉक वाटतं" हे शब्द ऐकले आणि हे सर आहेत हे विसरून नाकावरच्या रागाने " मी ताईचे कपडे नाही घालत हा माझाय." असे जोरदार उत्तर आले. स्वतःच्या वस्तूंवर जीवापाड प्रेम असण्याचे वय सर काय सांगताहेत हे ऐकूच शकले नाही. सर जितके प्रेमळ तितकेच रागीट, बहिणीचे कपडे घालण्यात काय कमीपणा यावरून मस्त कानउघडणी झाली आणि हिरमुसला गडी घरी परतला.

 

वर्षामागून वर्षे गेली. फ्रॉक गेला, क्लास गेला, सर गेले, छोट्या मुलीचे तर ते गावही सुटले. आता annual vacation ला भारतात घरी येताना मागच्यावर्षी ताईबरोबरच खरेदी केलेले वर्षभर पुरवून वापरलेले, फॅशन बदललेले चार ड्रेस घेऊन ती छोटी मुलगी घरी येते, बाहेर जायची वेळ आली कि त्यातलाच एक काढते आणि हा काय ड्रेस आहे ह्यावरून नाराज होते. मग ताईचे कपाट उघडते. तुला आवडेल तो, बसेल तो, ड्रेस घे म्हटले कि अलिबाबाचा खजिनाच मिळालेली ती एक सुंदरसा ड्रेस घेऊन आनंदाने मिरवते. परत जाताना तो आणि असेच २-४ ड्रेस घेऊन जाते. नंतर वर्षभर, माझ्या ताईचा ड्रेस आहे मी ढापलाय असे अभिमानाने सांगत, मिरवत राहते. एक छोटेसे आयुष्यातले चक्र पूर्ण होत फिरतच राहते!



उपजे ते नाशे। नाशलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसे। परिभ्रमे गा।। (सार्थ ज्ञानेश्वरी २.१५९)

(Photo Credit: www.arcgis.com/)

- श्रुतकिर्ती     
१६/१०/२०२०

Comments

  1. The situation has not changed significantly. It's our attitude - drushtikon - to look at the situation has broadened. It reflects in our happiness. It's called maturity.
    Khup sunder and sadhe example . Congrats Shruti.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you. Agre its the attitude at that point of life.

      Delete
  2. आहाहा! काय सुंदर लिहिलं आहे, डोळ्यात पाणी तरळलं. आणि त्याला ज्ञानेश्वरीतील ओवीची जोड.
    खरंच! माऊलींच्या ओवीतला भाव कधीही, कसाही, कुठुनही, अलगद तरंगून मनमंदिरात स्थिरावतो. मग जाणवते ती पूर्णता, विचारांची आणि अस्तित्वाची.
    💜🙏💜

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अशाच नेणिवेत राहतात ,आणि आपल्याही नकळत परिस्थितीला चपखल बसतात.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान