एक होती परी...

सुनिताबाई देशपांड्यानी 'आहे मनोहर तरी' मध्ये पाखरांना सांगण्याच्या गोष्टीत, एक होती परी कि एक होती म्हातारी... एक होती परी आणि ती झाली म्हातारी असे म्हटलेले वाचले आणि आठवणीतल्या सगळ्या म्हाताऱ्या पऱ्या डोळ्यापुढे फेर धरून नाचू लागल्या.

साधी पुरी करताना ती टम्म फुगली किंवा अगदीच फुगली नाही कि मला दुर्गाबाई भागवतांचा, करणारा फुगला म्हणजे चिडला नसला कि पोळी, पुरी फुगते हा संदर्भ हमखास आठवतो आणि उगीच हसू येऊन मनावर जादूची कांडी फिरते. टोपपदाराची साडी पाहिली कि शान्ताबाई शेळक्यांना अक्का म्हणणाऱ्या सरोजिनी बाबर आठवतात, तर अठराव्या शतकातली युरोपिअन चित्रे पहिली कि Jane Austin आठवते. या आणि अश्या कितीतरी छोटया छोटयाजादू करणाऱ्या पऱ्या अवती भोवती सदैव वावरतात आणि असंख्य जादुई क्षण देऊन जातात.

रोजच्या कामात अगदी साधा सुरकुतलेला कपडा नीट झटकून वाळत घालताना किंवा अगदी साधी आमटीला फोडणी घालताना ते काम आईसारखे जसेच्या तसे जमले कि लहानपणापासून असंख्य जादू करणारी आपल्या आयुष्यातली हि आद्य परी आपल्या वाढत्या वयाबरोबर म्हातारी झाली याची प्रकर्षाने जाणीव होते. शाळेतल्या बाई, आवडती लेखिका, एखाद्या कथेची नायिका, रोज ज्यांची गाणी ऐकतो, गुणगुणतो अशी गायिका या कोणत्याही छोट्याश्या trigger point ने आठवतात आणि मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात मग त्या माझ्या पऱ्याच न्हवेत कां?

परीकथांच्या पुस्तकातल्या पऱ्या खऱ्या वाटायचे वय संपतानाच अशा असंख्य जणी आयुष्यात आल्या आणि त्यांनी मनाचे जादूचे जग, त्या magical moments कधी हरवूच दिल्या नाहीत. आपल्याला हे सुखद क्षण देणाऱ्या त्या पऱ्याना कधी कळलेही नसेल, ना आपण कधी सांगितले असेल कि हे क्षण किती मोलाचे होते... आहेत. गोष्टीतली परी स्वतःला काही मिळेल म्हणून कुठे जादू करायची? मंत्र म्हणायची? काडी फिरवायची? ती तर परी होती. ते तर तिचे कामाचं होते म्हणून तर ती गोष्टीत असायची. या असंख्य पऱ्या देखील अशाच, नकळत जादू करणाऱ्या, त्यांचे काम करताना पुढची अनेक वर्षे टिकणाऱ्या, मनाला गारवा देणाऱ्या आठवणी निर्माण करणाऱ्या. कथेतल्या परीसारख्या योग्यवेळी योगयाजागी प्रकट होणाऱ्या. काम संपले कि आपापल्या जगात अदृश्य होणाऱ्या.

कथेतल्या पऱ्या भेटायला काही खास कारण तरी लागे पण या मात्र सदैव भोवताली वावरणाऱ्या, त्या दिसायला आणि त्यांची जादू उमजायला मात्र वेगळा चष्मा डोळ्यावर चढवायला हवा.

या आणि अशा अगणित पऱ्यांच्या गावीही नाही कि त्या कोणाच्या तरी मनाच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात कायमच्या वसतीला आहेत. हे जाणवले कि मनात येते, आपल्याही नकळत कोणाच्यातरी मनातली परी होण्याची जादू आपल्यावरही कोणी करेल कां? काही वर्षांनी एक होती म्हातारी ऐवजी एक होती परी ती झाली म्हातारी असे कोणी म्हणेल कां?

- श्रुतकिर्ती 

०६/११/२०२०

                                                Photo Credit: परी ग परी (विंदा करंदीकर)

Comments

  1. Yesss nakkich mhanel tula... pari rani 🧚🏼‍♀️.... aflatun ... jamch avadala 👌🏻👌🏻👌🏻Sunder lekh

    ReplyDelete
  2. Yesss nakkich mhanel tula... pari rani 🧚🏼‍♀️.... aflatun ... jamch avadala 👌🏻👌🏻👌🏻Sunder lekh

    ReplyDelete
  3. तू तर बर्‍याच जणींच्या मनातली ती परी आहेस या बद्दल शंकाच नाही. लिखाण खूप आवडलं. 💞😇

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान