रांगोळी

दिवाळीच्या तयारीसाठी कपाट उघडले आणि कोपऱ्यात एका काचेच्या बरणीत पुण्याहून सांभाळून आणलेली पांढरी रांगोळी दिसली, मन बघताबघता कितीतरी विचारांना, आठवणींना स्पर्शून आले.

रांगोळी या शब्दाबरोबर मनाला दिसतात ते आईने देवापुढे काढलेले शंख,चक्र,गदा ,पद्म! कितीतरी वर्षे लोटली तरी त्याचे चित्र लक्खपणे डोळ्यापुढे उभे राहते. कुठल्याही बिल्डिंगचा जिना उतरताना एखाद्या दारापुढे रांगोळी दिसली की नजर एक क्षण ठरतच असे. नीटनेटकी ठिपक्यांची रांगोळी हे घर टापटिपीचे असेल असा भास उगाचच निर्माण करी.

लहानपणी दिवाळीत पुढच्या मागच्या अंगणात रांगोळी काढणे हा एक मोठा कार्यक्रम. कागदाला उदबत्तीने भोके पाडून सरळ रेषेत ठिपके काढायला मोठे skill लागे. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी माझे फ्रीहँड तेवढ्याच दिमाखात सगळ्यांना दाखविणारे आईबाबा आजही आठवतात न्हवे जाणवतात. आपण वेडीवाकडी रांगोळी काढलीय हे कधी गावीही नसे, काढल्याचाच आनंद फार मोठा असे.

पुराणापर्यंत इतिहास असणारी रांगोळी तिचा संस्कृत अर्थ; कलेचा रंगाद्वारे अविष्कार (a creative expression of art through colours) आपल्या विचारणा मोठा आयाम देऊन जाते. दाराच्या उंबरठ्यापासून ते रस्त्यावरच्या संस्कारभारतीच्या भल्या मोठ्या रांगोळ्या मग डोळ्यापुढे फेर धरतात. त्यातच मग आठवण येते निसर्गाच्या रांगोळ्यांची. नीलमोहोर, गुलमोहोर, बहावा, पारिजात सगळेच तर रंगांचा उत्सव मांडतात. काळ्याभोर आकाशातील constellations आकाशाच्या दरबारातील रांगोळ्याच तर असतात. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना जोडून अनेक आकृतिबंध मनातल्या मनात तयार होत राहतात. ढगांच्या रांगोळ्या तर प्रत्येकाला वेगळ्याच दिसतात.

पाचवी सहावीत असताना पहिल्यांदा वाचलेल्या रणजित देसाईंच्या 'स्वामी' कादंबरीतील माधवराव पेशव्यांच्या तोंडची, 'समुद्रकिनारी वाळूतली खेकड्यांनी काढलेली रांगोळी पाहून तुझा अभिमान विरून जाईल.' ही वाक्ये दर वेळी जगभरच्या समुद्रकिनाऱ्यावर आठवत राहतात. ताटाभोवती सुंदर रांगोळ्या घालणारी आणि खरकटे सांडून वेगळीच रांगोळी काढणारी दोन्हीप्रकाराची माणसे उगीचच मनाच्या कप्प्यातून बाहेर येतात. द्विमितीतील सुंदर नाजूक रेषा असलेली कावेच्या रंगावरची पांढरी रांगोळी आताशा स्वप्नातच येते पण छोट्याश्या tile वर acrylic रंगांनी दिवाळीत दुधाची तहान ताकाने भागतेच. गेलाबाजार कुंदनच्या रांगोळीवर समाधान मानूनही कुठेतरी मनातला nostalgia जपल्याचा आनंद आजही मिळतोच आहे की.

मनाच्या अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्याच्या आपल्या कसबाला काळवेळ,भौगोलीक सीमा यांचे बंधन कधी असणारच नाहीय हे किती छान आहे याची जाणीव अशा निसटत्या क्षणातच होते आणि एकदम 'दिल गार्डन गार्डन हो गया' वाले फीलिंग येते.


- श्रुतकिर्ती 

१३/११/२०२०

     Photo Credit: The Lotus Shakti

आनंदाची दिवाळी । घरी बोलवा वनमाळी । घालिते मी रांगोळी । गोविंद गोविंद ||

संत जनाबाई

Comments

  1. श्रुती, खूप सुंदर लेख आहे, नेहमीप्रमाणेच.
    ह्या वेळेस रांगोळी paintings करता करता, शंख, कूर्म, ज्ञान कमळ रेखाटताना निसर्गाच्या सृजनशीलतेने परत एकदा मन आकर्षून घेतले आणि बहरून टाकले. तुझ्या या लेखाने मला माझ्या आठवणींच्या कप्प्यात नेले. धन्यवाद, शुभ दीपावली. __/\__. 💞

    ReplyDelete
    Replies
    1. कल्याणी, तुझे शंख, कुर्म यावेळची माझी दिवाळी झगमगित करताहेत.
      तुझ्या canvas च्या रांगोळ्या( paintings) माझ्या पुढच्या अनेक अठवणींचा भाग असतील.
      शुभ दिपावली🪔

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान