वाट...

 

Turn right after 500 metres असे GPS काकू शांतपणे सांगत होती आणि मीही वळायची तयारी करू लागले. ती सांगेल तिकडे जाण्यातला यांत्रिकपणा उजवीकडे वळल्यावर लक्खपणे जाणवला, डावीकडे वळल्यावर काय लागते हे चौकात बघायचेच राहून गेले होते.


नकाशाने ठिकाण शोधणे सोपे केले पण निदान तो वाचताना दिशा चुकण्याची तरी शक्यता होती. नकाशा उलटा धरला म्हणून तरी वेगळे ठिकाण सापडत होते. इथे सगळे सरधोपट होते. चुकू म्हटले तरी हि reroute करून योग्य ठिकाणीच नेणार होती. मनात आले रोजच्या जगण्याचा GPS नको असायला. कोणता मार्ग निवडू याचा विचार करायला,चुकायला,सल्ला मागायला वाव तर हवाच. या पाऊलवाटा, रानवाटा, रस्ते, हमरस्ते.... प्रत्येक प्रवाशाला त्यांचे आकर्षण असतेच. सगळ्यांनी चोखाळलेली चालून चालून गुळगुळीत झालेली वाट सोपी असली तरी मनातल्या भटक्याला अनवट वाटेवर जावे वाटतेच, पुढे जाऊन हा रस्ता ध्येयाला पोचणार का no through असणार हे जाणून घेण्याचे कुतूहल शिल्लक राहावे.


समोर दोन वाट आल्या कि मनात संभ्रम निर्माण होतो. निवड कधीच सोपी वाटत नाही. 'The Road Not Taken' या कवितेत Robert Frost हा कवी म्हणतो देखील, “And sorry I could not travel both ...” कितीही इच्छा असली तरी एकावाटेवर चालावे लागते. याच कवितेच्या शेवटात, “I took the less travelled by” हे वाचताना अशा अनेकांनी चोखाळलेल्या वाट न निवडणाऱ्यांच्या धैर्याचे कौतुक वाटत राहते. खूप वेळा मनात असूनही less travelled वाटेवर न जाता येण्याचे शल्य बोचत राहते. चाकोरीत राहूनही दूरवरची वेगळी वाट मनाला खुणावते. या चाकोऱ्या ओलांडण्याची हिम्मत अनेकांनी दाखविली आणि त्याची फळे आपल्यासारख्या चाकोरीबद्धांनी चाखली. गर्दीबरोबर चालणाऱ्या रोजच्या सध्या सरळ मनाला 'एकला चालो रे' वाटणारा दिवसही असतोच कि. वाट चुकुनये वाटणाऱ्याला चकव्याची भूल पडतेच कधीतरी.


घराकडे नेणारी, प्रियजनांना भेटवणारी, स्वप्नातल्या गावाला पोचवणारी वाट निमिषार्धांत संपते पण काही वाटा, काही रस्ते सरता सरत नाहीत. दोष त्या रस्त्याचा नसला तरीही.


रस्त्यावर चालताना कितीही GPS, maps, apps असले तरी मनाला मात्र प्रवासात ते नकोच नकोत. वळणापलीकडे काय? हि उत्सुकता कायम टिकायची तर मनातल्या जिप्सीला दिशांचे बंधन मुळीच नको. थोडे चुकत माकत, विचारपूस करत... थांबत थांबत ते कुठेतरी नक्कीच पोहचेल आणि मग तेच त्याचे मुक्कामाचे ठिकाण असुदे.




चुकली जरी दिशाही हुकले ना श्रेय सारे,

वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

- विंदा करंदीकर. 


- श्रुतकिर्ती 

२०/११/२०२०

Comments

  1. हा लेख वाचून एक quote आठवला, जो मला खूप आवडला आणि अधूनमधून तो वाचला की तात्पुरतं का होईना "adventurous" वाटतं 😃.
    "do not go where the path may lead go instead where there is no path and leave a trail" Ralph Woldo Emerson.

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर quote, थोडावेळ कां होईना adventurous वाटणे महत्वाचे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान