
रोज संध्याकाळी फिरायला जाताना बऱ्याच घरांमधून स्वयंपाकाचे वास येत असतात. आपले जेवण घरी तयार असले तरी हा वास कोणत्या पदार्थाचा हा guessing game मेंदू खेळतच राहतो. काही काही पदार्थांचे , वस्तूंचे गंध मनातल्या असंख्य तारा छेडून जातात. नाकाला जाणवणारे हे वास मनाला वेगळ्याच जगात transport करतात. सकाळी सकाळी कॅफे समोरून नुसते चालत गेले तरी खडबडून जाग येते , पोटात कॉफी न जाता देखील. पहिल्या पावसाचा सुगंध प्रत्येकाला आवडतो. कवीला कविता सुचवतो तर तुम्हा आम्हाला वेध लावतो तेलात चुर्रर्र आवाज करत तळल्या जाणाऱ्या डाळीच्या पिठाचे. खरपूस भाजली गेलेली माती आणि त्यावर पडलेले पाण्याचे चार थेंब! त्यामागून मनात यायला लागतो तो रस्ताभर सडा पडलेल्या गगनजाईच्या फुलांचा सुवास. या सुवासांना जोड मिळते या पावसाळी वातावरणात येणाऱ्या सणावारातील फुले पाने , उदबत्ती , कपूर याच्याबरोबर येणाऱ्या नैवैद्यातल्या पदार्थांची. एकदा कोणताही सणवार नाहीच हे माहित असताना देखील आमच्या घरी जेवायला आलेल्या पाहुण्याला सत्यनारायण आठवलेला. कारण फक्त अळूवडी आणि उदबत्ती यांचा एकत्रित वास. समुद्राच्या जवळ पोचायला ल...